मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे ज्येष्ठ नेते व गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर असताना काही राजकीय घडामोडी घडला. सध्या भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. त्यातच काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना दांडी मारली. त्यामुळे चव्हाणांची नाराजी आणि भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.
भाजप नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे भेट झाली, पण राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण दोघांनीही यावेळी माध्यमांकडे दिले होते. तथापि, चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला या निमित्ताने पेव फुटले. मात्र, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्येच राहतील, असे स्पष्ट केले होते.
आता पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत, अमित शहांचा मुंबई दौरा आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जात आहे. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचं मत व्यक्त करत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला. दुसरीकडे आज काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला माजीमंत्री अशोक चव्हाण हेही उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
माजी मंत्री जितू पटवारी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद बोलावली होती. काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची पत्रकार परिषद होती. मात्र, या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण आलेच नाहीत. पत्रकार परिषदेत नाव असताना सुद्धा चव्हाण गैरहजर राहिले. मुंबईमध्ये आज अमित शहा यांचा दौरा असल्याने ते पत्रकार परिषदमध्ये गैरहजर असल्याची चर्चा होत आहे. या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण हे पक्ष सोडण्याबाबत बोलण्याची शक्यता होती. मात्र, चव्हाण न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, दिल्लीतून भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. दोन्ही नेते मूळ काँग्रेसचेच असल्यामुळे ही बोलणी आणखी यशस्वी होतील असे सांगितले जात आहे.
Congress Leader Ashok Chavhan Absent in Party Press Conference
HM Amit Shah Mumbai Tour BJP Politics