मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नवनियुक्त कार्यकारिणीची दोन दिवसांची निवासी कार्यशाळा पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे आयोजित केली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे या कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. दोन दिवसांच्या कार्यशाळेत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
१० ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी कार्यशाळेसाठी निमंत्रीत पदाधिका-यांची नोंदणी होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वा. सामुदायिक प्रार्थना होईल व सकाळी ९.३० वाजता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ऑनलाईन संबोधनाने शिबिराचा शुभारंभ होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचा समारोप होईल.
दोन दिवसांच्या कार्यशाळेत विविध चर्चासत्रेही होणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीची बैठकही होणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख पवन खेरा, राष्ट्रीय प्रवक्त्या व सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत, इतिहासकार अशोक कुमार पांडेय, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, पत्रकार निरंजन टकले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यशाळेला संबोधित करणार आहेत.
