नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – देशभरात गेल्या सात वर्षांपासून सर्वत्र भारतीय जनता पक्षाचा बोलबाला असल्याने एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय झाल्याचे म्हटले जाते. परंतु काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभारी घेण्याच्या प्रयत्न करत आहे, असे दिसून येते. यासाठी पक्षांतर्गत वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
भारतीय राजकारणात हरवत चाललेली आपली पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेस हालचाल करत आहे. उदयपूरमध्ये नुकत्याच झालेल्या चिंतन शिबिरानंतर काँग्रेसने राजकीय घडामोडींचा गट आणि टास्क फोर्स-2024 ची स्थापना केली आहे. राहुल गांधी यांचा राजकीय घडामोडी गटात समावेश करण्यात आला आहे, तर प्रियंका गांधी यांना टास्क फोर्स-2024 चे सदस्य बनवण्यात आले आहे.
याशिवाय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही अनेक बंडखोर नेत्यांना स्थान दिले आहे. या दोन गटांशिवाय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही भारत जोड यात्रेसाठी मध्यवर्ती संघटना स्थापन केली आहे. दिग्विजय सिंह, सचिन पायलट, शशी थरूर, रणवीत सिंह बिट्टू, के.जे. जॉर्ज, जोथी मणी, प्रद्युत बोलडोलोई, जितू पटवारी, सलीम अहमद यांना यात स्थान मिळाले आहे.
तसेच राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझादी, अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, आनंद शर्मा, के.सी. वेणुगोपाल, जितेंद्र सिंग यांचा काँग्रेसने स्थापन केलेल्या राजकीय घडामोडी गटात समावेश करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे टास्क फोर्समध्ये पी. चिदंबरम, मुकुल वासनिक, जयराम रमेश, के.सी. वेणुगोपाल, अजय माकन, प्रियंका गांधी, रणदीप सुरजेवाला, सुनील कोंगोलू यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसने जारी केलेल्या पत्रात टास्क फोर्सच्या प्रत्येक सदस्याला संघटना, कम्युनिकेशन आणि मीडिया, वित्त आणि निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित काम दिले जाईल, असे म्हटले आहे.