नवी दिल्ली – कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आता आक्राळ विक्राळ रुप धारण करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला. बारावीच्या परीक्षा तात्पूरत्या टळल्या आहेत तर दहावीच्या परीक्षा रद्दच करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने आनंद व्यक्त केला आहे. मात्र विरोधक ते विरोधकच. काँग्रेसच्या समर्थकांनी त्याचवेळी या निर्णयाचे क्रेडीट राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना देऊन टाकले.
काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करण्यात आले आहे की, ‘मोदीजी तुम्ही राहुल आणि प्रियांका गांधी यांची सूचना एेकली हे छान केले. देशाला पुढे नेण्यात काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल. लोकांच्या कल्याणासाठी एकत्रीत काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. भाजपने अहंकार बाजुला ठेवून राष्ट्रहिताला महत्त्व दिले हे छान झाले.’ काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील केंद्र सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी बारावीच्या परीक्षांच्या बाबतीतही अंतिम निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, ‘अखेर सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला याचा आनंद आहे. आता बारावीच्या परीक्षांचाही निर्णय व्हावा. जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अकारण दडपणात ठेवणे योग्य नाही. त्यामुळे आताच अंतिम निर्णय व्हायला हवा.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व अलीकडेच बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते. या बैठकीत परीक्षांच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून दाहावी व बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करीत होते. राहुल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह इतर नेत्यांना सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.