विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जात सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. अनेक निवडणूकांमध्ये अपयशी ठरलेल्या या पक्षाला पुन्हा एकदा अपयश का आले किंबहुना यशापासून वारंवार दूर का राहावे लागत आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विशेषत: आसाम आणि केरळसारख्या राज्यांत पक्षाला विजय मिळवता आला असता. मात्र येथेही पराभव झाला आहे. कारण कॉंग्रेस अजूनही आपल्या रणनीती व नेतृत्त्वाच्या धोरणात बदल करण्यास तयार नाही. तसेच मागील घटना घडामोडींपासून धडा घेण्यास तयार दिसत नाही. आता या पक्षाच्या अपयशाची कारणे जाणून घेऊ या…
जनतेचे मत जाणून घेणे
या निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की, कॉंग्रेसचे विद्यमान नेतृत्व एंटी-इन्कंबेंसीनंतरही जनमत जिंकू शकलेले नाही किंवा जाणून घेऊ शकले नाही. कॉंग्रेसच्या कमकुवत निवडणुकीच्या कामगिरीमुळे पक्षात गदारोळ होण्याची शक्यता वाढली आहे.
उदासिन भूमिका
कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष निवडून येण्यापूर्वी झालेला संघर्ष पाहता, पक्षाच्या असंतुष्ट गटाच्या नेत्यांची भूमिका सतत कॉंग्रेसच्या सतत घसरणीचे कारण ठरले आहेत. विशेषत: पक्षाच्या कमकुवत स्थिती आणि नेतृत्त्वाच्या कोंडीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नाराज नेत्यांची पाच राज्यांमधील निवडणुकांदरम्यान कोणतीही सहकार्याची भूमिका नव्हती.
रणनीती कमकुवत
निवडणूक रणनीतीचे कामकाज संपूर्णपणे कॉंग्रेसचे विद्यमान नेतृत्व आणि त्यांच्या जवळील पक्षाचे रणनीतिकार यांच्या हाती राहिले, आणि ते त्यात कमी पडले. त्यामुळे आसाम आणि केरळसारख्या दोन महत्त्वाच्या राज्यात सत्तेसाठी दावेदार असूनही कॉंग्रेस विजयापासून लांबच राहिली. आसाममधील बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाबरोबर आघाडी करण्याचा धोका पत्करावा लागला आणि केरळमधील मणी जोसेफ यांना केरळमधील एलडीएफच्या युतीमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी देण्यावरुन खळबळ उडाली.
प्रादेशिक पक्षांचे आव्हान
कॉंग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय आव्हानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता मजबूत झालेल्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव रोखण्याचे आव्हान उभे राहीले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्यामुळे स्पष्ट झाले आहे की एकीकडे प्रांतात कॉंग्रेसचा राजकीय आधार सतत घसरत आहे, तर दुसरीकडे प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते राष्ट्रीय पातळीवरील राजकारणामध्येही त्याचे स्थान निर्माण करत आहेत.
भावनिक सहभाग
कॉंग्रेसला राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली प्रासंगिकता टिकवायची असेल तर लोकांशी भावनिक सहभाग वाढवावा लागेल आणि यासाठी पक्षाने लोकप्रिय आणि योग्य संदेश देणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत केवळ पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी फक्त सोनिया गांधींचे नेतृत्व आवश्यक आहे. तसेच जर राहुल गांधींना कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून परत आणण्यासाठी पुढाकार घेण्यात आला तर पक्षाची एकता पुन्हा नष्ट होऊ शकते, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते.