विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पराभवाचे विश्लेषण आणि आढावा घेण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गठित या समितीत नाराज असलेले मनीष तिवारी यांचाही समावेश करण्यात आला आहे. पराभवाचे मंथन करण्यासाठी समितीची तत्परतेने स्थापना करून काँग्रेस नेतृत्वाने पक्षामधील पडझड थांबविण्याचेही प्रयत्न केले आहेत. या समितीला दोन आठवड्यात आपला अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सुपूर्द करायचा आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर २४ तासातच या समितीची स्थापना करून पक्षश्रेष्ठींनी हे दाखविण्याचाही प्रयत्न केला आहे की पक्षासमोर उभे राहात असलेल्या आव्हानांमधून मार्ग काढण्यासाठी नेतृत्व त्वरित पावले उचलत आहे. महाराष्ट्रातील राजकारणात रस असलेले अशोक चव्हाण दिल्लीतील राजकारणात कमी सक्रिय असतानाही त्यांना समितीचे प्रमुख म्हणून निवडणे महत्त्वाचे मानले जात आहे. या समितीमध्ये मनीष तिवारी यांच्याशिवाय माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय परिपेक्ष्यात काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मनीष तिवारी यांचा समावेशही महत्त्वाचा मानला जात आहे. ईशान्येतील राज्यांमध्ये पक्षाच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी समितीत लोकसभा खासदार ए. पाला यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच केरळमध्ये झालेल्या पराभवाच्या मीमांसेसाठी लोकसभेतील तरुण खासदार ज्योती मणी यांनाही स्थान देण्यात आले आहे. दोन्ही खासदार पक्षश्रेष्ठींचे विश्वासू नेते आहेत.
कोविड टास्क फोर्समध्ये यांचा समावेश
काँग्रेसमध्ये असंतुष्ट नेत्यांना बाजूला करण्यात येणार नाही, असा संदेश देत सोनिया गांधी यांनी जी-२३ चे प्रमुख गुलाम नबी आझाद काँग्रेसच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख बनविले आहे. आझाद यांच्या नेतृत्वाखाली गठित पक्षाच्या १३ सदस्यीय टास्क फोर्समध्ये सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, पवन बन्सल, के. सी. वेणुगोपाल, मुकूल वासनिक यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. कोविड महामारीमुळे पीडित लोकांची मदत करून देश-परदेशात प्रसिद्ध झालेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांचाही टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. कोरोना महामारीने पीडित लोकांना दिलासा देण्यासाठी काँग्रेसच्या प्रयत्नांना संघटित स्वरूप देण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.