नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला पराभव आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीत काँग्रेसला वगळल्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष आता आपली रणनीती बदलत आहे. विरोधकांची एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेसने तृणमूल काँग्रेसशी संबंध पुन्हा सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पक्षसंघटनेत बदल करण्याचे संकेत मिळत असून, लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना हटविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांना हटविल्यानंतर त्यांच्याजागी राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
एका हिंदी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, लोकसभेत विरोधी पक्षनेत्यासाठी राहुल गांधी यांचे नाव सर्वात वर असल्याची माहिती दोन वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. परंतु राहुल गांधी ही जबाबदारी स्वीकारायला तयार होत नसल्याने याबद्दल अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. राहुल यांनी हे पद स्वीकारावे यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यासुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दल कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला. राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारल्यास काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीचा विचार होऊ शकतो. असे झाल्यास काँग्रेसमध्ये निवडणुकीची मागणी करणार्या असंतुष्ट जी-२३ नेत्यांची मागणीही पूर्ण होणार आहे. परंतु अखिल भारतीय काँग्रेस समितीचा कार्यकाळ २०२२ पर्यंत असल्याने अध्यक्षपदाचा निर्णय नंतरच होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांना विरोधीपक्ष नेतेपद देण्यास अनेक नेत्यांचा विरोध आहे. काँग्रेस अध्यक्षपदापेक्षा लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कठीण आहे. त्यामुळे राहुल गांधी फक्त लोकसभेपर्यंतच मर्यादित राहतील, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.
बंगालमध्ये काँग्रेसचा भोपळा
लोकसभेत काँग्रेसच्या संसदीय दलाचे नेते अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगाल प्रदेशाध्यसुद्धा आहेत. बंगालच्या मुख्ममंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधी म्हणून चौधरी यांना ओळखले जाते. निवडणुकीदरम्यान त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. तरीही पक्षाला बंगालमध्ये भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसने डाव्या पक्षांसोबत निवडणूक लढविली होती. काँग्रेसचा कोणतेही मोठे नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले नाहीत. राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस प्रचारसभा घेतली होती. परंतु त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली नाही.
चौधरी यांची गच्छंती अटळ
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभेत सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसला तृणमूल काँग्रेसच्या मदतीची गरज आहे. तर बंगालच्या राज्यपालांना माघारी बोलावण्यासाठी तृणमूल काँग्रेसला काँग्रेसच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय साधला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीशी काँग्रेसच्या या कृतीला जोडले जात आहे. कारण ही बैठक तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रमंचाच्या बॅनरच्या खाली झाली होती. त्यामुळे काँग्रेस ममता बॅनर्जी यांच्याशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत आहे.
अहवाल सादर
दरम्यान, पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील समितीने अध्यक्ष सोनिया गांधी यांना अहवाल सोपविला आहे. बंगालमधील पराभवाला अधीर रंजन चौधरी जबाबदार असल्याचे अनेक नेत्यांना वाटत आहे. अहवालाचा अभ्यास सुरू असून, त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.