मुंबई – केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने अनोखे आणि आक्रमक कॅम्पेन सुरू केले आहे. खासकरुन इंधनांच्या वाढत्या किंमती आणि वाढणारी महागाई या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक विक्रम करीत आहेत. याची सर्वसामान्यांना मोठी आणि थेट झळ पोहचत आहे. घरगुती गॅस सिलेंडरची सबसिडीही मोदी सरकारने बंद केली आहे. इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचे भाडे वाढले. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर झाला आहे. परिणामी, सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. हाच धागा पकडून काँग्रेसने आता सोशल मिडियात अनोखे कॅम्पेन सुरू केले आहे. महंगी पडी मोदी सरकार या नावाखालील हे कॅम्पेन सध्या विशेष चर्चेचे आणि सर्वसामान्यांच्या भावना बोलून दाखविणारे असल्याचे निदर्शनास येत आहे.