मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील माजी खासदार व चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सूनबाई श्रीमती मीनल पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडला. काँग्रेस पक्षाचा गमछा घालून आम्ही त्यांचं पक्षात स्वागत केले.
याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हुसैन दलवाई, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहन हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
खतगावकरबरोबर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी नाना पटोले म्हणाले की, खतगावकर यांच्या प्रवेशाने काँग्रेसला बळ मिळेल. नांदेडमध्ये कुणाची ताकद होती हे लोकसभेत दिसले आहे असेही ते म्हणाले.