सुदर्शन सारडा, नाशिक
नाशिक: गल्ली ते दिल्लीच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा एकेकाळी हुकुमाचा एक्का समजला जात होता. नुकत्याच झालेल्या लोकसभेत महाविकास आघाडीच्या एकदीलाच्या अंडर करंट मुळे एक ची मजल दूहेरी आकड्यात झाली. पण हाच पक्ष सध्या पाळेमुळे घट्ट करण्यासाठी कुठे काम करत आहे हा संशोधनाचा विषय आहे. काँग्रेस पक्षाची ग्राउंड रिॲलिटी मात्र तू कुठे तर मी कुठे अशी असल्याची चर्चा आहे. ज्या पक्षांच्या नेत्यांचे पदग्रहण, वाढदिवस अथवा अन्य शुभ कामांत लागत असलेल्या फ्लेक्सवर शुभेच्छा देणाऱ्यांनी तमाम कार्यकर्त्यांनी जरी त्यात झोकून दिले तरी काँग्रेस पक्ष ग्रामीण भागात घट्ट नाळ करेल यात शंका नाही. यासाठी कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देणे अत्यंत महत्वाचे आहे.
पक्षातील पारंपरिक घरणी सोबतच इतर काम करणाऱ्यांना देखील महत्वाचे पदं देणे महत्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला एखादं पद बहाल केल्यानंतर पूर्वपरंपरा असलेल्या पदग्रहण सोहळ्याला आता टार्गेट बेस करून त्याचे नामांतर मतग्रहण सोहळा ठेवल्यास निदान एकला चलोची ताकद कुठेतरी चमकून पक्षाला नवी संजीवनी मिळेल असा सूर खानदानी काँग्रेसवाले लावत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक म्हणून काँग्रेस पक्ष लढला. बेरजेच्या राजकारणाला कुठेही थारा न मिळाल्याने काँग्रेसला मित्रपक्षांनी जोपासलेल्या एकनितीचा फायदा झाला. पण पक्षाच्या मुशीत तयार होऊन इतर पक्षात गेलेले अनेक नेते नीटनेटके स्थिरही झाले परंतु वास्तविक काँग्रेस पक्ष आजही दरबारी राजकारण सोडण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. देशावर सहा दशके राज्य केलेल्या पक्षाला आज अनेक गावात आंदोलनाला कार्यकर्ते राहिले नसताना राष्ट्रीय चेहरा हृदयस्थ ठेऊन ग्रामीण भागात पक्षाची नेमकी ताकद कुठे आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे. नाशिक जिल्ह्यातला मतदार हा चाणाक्ष समजला जात असला तरी राजकीय पक्षांच्या बाबतीत तो मिसळ इतकाच चोखंदळ आहे. अशातच गेल्या दोन दशकांपासून मतदारांवर प्रभाव पाडण्यात फक्त राहुल गांधी केंद्रस्थानी झेंडा रोवून आहे.
राहुल गांधीबाबत सकारात्मक असलेले काही नेते सोशल मिडियात दाखवत असलेले इंटरेस्ट जमिनीवर का दाखवत नाही हा खरा अभ्यासाचा विषय आहे. ज्या मुख्य नेत्यांकडे मोठी पदं आहेत त्यांच्या मागे जनाधार आहे का हे ही तपासणे गरजेचे आहे. दिल्लीत वजन आणि गल्लीत वजन काटाच खराब असणारे नेते अनेक ठिकाणी गाडीच्या काचा मोकळ्या न करता गर्दीत फिरताना दिसत असताना नेमका त्यांच्याच डोक्यातून विस्तार शब्द लोप पावत चालला कि काय असा प्रश्न सध्या राजकीय जाणकारांना पडलेला आहे.
तब्बल दहा वर्षानंतर राहुल गांधींच्या रूपाने देशाला विरोधीपक्ष नेतेपद मिळाले आहे. संसदेत त्यांनी आपला बाण हळू हळू बाहेर काढायला सूरवात केली आहे. त्यांच्या दिल्लीतील आक्रमकतेची धार गल्लीत चमकायला काँग्रेस पक्षाला शर्थीने प्रयत्न करावे लागतील.वाढलेल्या जनाधार मध्ये आणखी वाढ कशी होईल यासाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात उरलेल्या शंभर दिवसात चांगले अभियान राबवून लोकांच्या मनात उतरावे लागेल.सद्यस्थितीत ग्रामीण भागात पक्ष तोंडपाठ असला तरी नेते, कार्यकर्ते लोकशाहीचे मालक असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचत नसल्याने सक्रियता वाढवणे हाच एकमेव पर्याय पक्षासमोर आहे.काळ आला पण वेळ चुकायला नको इतकं जरी मनात रुजवलं तरी काँग्रेसने खूप काही कमावलं म्हणून समजा.