चंदीगड – पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताविरोधी वातावरण आणि काँग्रेस पक्षातील वर्चस्वाच्या लढाईत एकटे पडलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अखेर मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना वेळ दिला जात होता. परंतु संकेत समजण्यास कॅप्टन यांना अपयश आले. आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यात कॅप्टन कमी पडतील याची कुणकुण काँग्रेस नेतृत्वाला लागली होती. शेतकरी आंदोलनाबाबत त्यांचे वक्तव्य आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश हेच त्यांच्या जाण्यास कारणीभूत ठरेल आहे. आम आदमी पक्षाकडून आक्रमकपणे प्रचार होत असताना त्यांच्या आव्हानाला कॅप्टन प्रतिकार करतील का हाच यक्ष प्रश्न काँग्रेसमध्ये उपस्थित होत होता. त्यामुळे अखेरच्या क्षणी काँग्रेसने बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसच्या या निर्णयाने निवडणुकीतील आव्हाने वाढली आहेत. मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा दिल्यानंतर भविष्यातील पर्याय खुले आहेत, असे कॅप्टन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही दुसर्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपद सुपूर्द करून कॅप्टन शांत बसणार नाहीत हेसुद्धा स्पष्ट होत आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात प्रथमच त्यांना कोणीतरी आव्हान दिले आहे. पंजाब काँग्रेसच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा एकसूत्री कारभार राहिला आहे. त्यांनी १९९८ मध्ये आपल्या अकाली दल (पंथिक) पक्षाचा काँग्रेसमध्ये विलय केला होता. चार वर्षांनंतर २००२ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसला कॅप्टन यांच्यामुळेच यश मिळाले आहे हेही नाकारता येणार नाही. परंतु गेल्या साडेचार वर्षांत निवडणुकीतील आश्वासनांना पूर्ण करण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला अनेक वेळा त्यांना दिल्लीला बोलावून निर्देशही द्यावे लागले. आता काँग्रेसकडे कोणता प्रर्याय आहे हा प्रश्न आहे. कॅप्टन सध्या योग्य वेळेची वाट पाहतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याचे म्हणणे आहे. त्यांच्यानंतर काँग्रेसकडून कोणाला मुख्यमंत्री बनविले जाते हेही ते बघतील, त्यानंतरच पुढील निर्णय घेतील.
भविष्यातील राजकारणासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे जास्त पर्याय नाहीत. शेतकरी आंदोलनामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच कॅप्टन यांच्या अपयशाचे खापर भाजप स्वतःच्या माथी घेणार नाही. त्यांचे वयही वाढले आहे. आम आदमी पक्षाने त्यांच्याविरुद्ध मोठा प्रचार केला आहे, त्यामुळे आप त्यांना सोबत घेणार नाही. त्यामुळे नवा पक्ष स्थापन करण्याचाच पर्याय त्यांच्याकडे दिसतो आहे. काँग्रेस सोडल्यानंतर कॅप्टन यांच्यासोबत किती आमदार जातील हे सांगणे कठीण आहे. कॅप्टन यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, कॅप्टन यांना सिद्धू यांच्यापेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असता तर त्यांनी विधीमंडळ दलाच्या बैठकीआधी राजीनामा दिला नसता. त्यामुळे पक्षातच राहून ते योग्य वेळेची वाट पाहतील आणि त्यानंतर भविष्यातील निर्णय घेतील.