इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगित देण्यात आल्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य चांगलेच चर्चेत आले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, शिवसेना शिंदे गटाने प्रचंड विरोध केल्यामुळे या दोन्ही नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.
रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट विरुध्द राष्ट्रवादी अजित पवार गटात वाद सुरु आहे. येथे सामूहिक राजीनामे देण्यात आले तर मुंबई – गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शने केली. तर नाशिकमध्ये मोठे नाराजी नाट्य सुरु झाले आहे. या ठिकाणी दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना पालकमंत्री करण्यात आले.
विजय वडेट्टीवार यांची टीका
नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्व हवे की मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी ? प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा महायुती सरकारची आज ही अवस्था आहे. ५० दिवसांनंतर जिल्ह्याला या सरकारने पालकमंत्री दिले. त्यात ही आता एका रात्रीत पालकमंत्री बदलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे!
आधी मंत्रीमंडळ विस्तार नंतर खाते वाटप आता पालकमंत्री जबाबदारी देण्यासाठी विलंब झाला आणि दिलेले पालकमंत्री बदलण्याची वेळ आली, हे फक्त एका कारणासाठी…. मोठा मलिदा कोणाला मिळणार!? जिल्ह्याचा आणि जनतेचा विकास राहिला दूर आधी स्वतःचा विकास करण्यासाठी महायुतीत धडपड सुरू आहे.