विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गेल्या सात वर्षांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात भाजपप्रणित सरकार आल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये मोठा बदल झाला आहे. या बदलांचे बरे वाईट परिणाम दिसून येत आहेत. सहाजिकच चांगल्या बदलांविषयी सत्ताधारी पक्षाला मानणारे कार्यकर्ते आणि काही नागरिक मोदी यांच्या निर्णयाची नेहमीच प्रशंसा करतात. परंतु विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या काँग्रेससह अन्य पक्षाच्या कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक नागरिक मात्र मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतात.
सध्या ही अशीच एक घटना घडली आहे. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून गेल्या ७५ वर्षांत भारतीय इतिहासात देशासाठी योगदान दिलेल्या नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली असून यात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची छायाचित्रच नसल्याने काँग्रेस पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिकांना देखील ही बाब खटकलेली दिसून येत आहे. यामुळे या धोरणाविरुद्ध वादंग उठले आहे. भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेने (आयसीएचआर ) स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्यासाठी ‘आझादी के अमृत महोत्सव’ या सोहळ्यांमधून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चित्र काढून किंवा वगळून टाकल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी ‘ आयसीएचआर ‘ वर टीका केली आहे.
याशिवाय, ज्येष्ठ नेते आणि लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी आयसीएचआरच्या फेसबुकवर मुख्य पानाचा स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, नेताजी सुभाष बोस, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडीत मदन मोहन मालवीय, क्रांतीवीर भगत सिंग आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या मान्यवरांचे छायचित्र आहेत. पण पंडित जवाहरलाल नेहरूंचे चित्र त्यातून गायब होते, असे म्हटले आहे.