इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूरः मोदी हे खोटारडे असून त्यांनी दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी प्रत्येकाला १५ लाख देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते; पण ते पूर्ण केले नाही. मोदींनी शेतकऱ्यांना धोका दिला. शेतीमालाला दुप्पट भाव देणार असे म्हणाले होते. ज्यांनी हमीभावाची रक्कम वाढवली नाही, ते शेतीमालाला दुप्पट भाव काय देणार, असा सवाल त्यांनी केला.
केंद्र सरकार जे आश्वासन देते ते पूर्ण करत नाही. ही मोदी यांची सवय आहे. काँग्रेस सरकारने काळा पैसा बाहेर ठेवला आहे. तो परत आणून मी प्रत्येकाला १५ लाख रुपये देईल, असे मोदी म्हणाले होते; पण त्यांनी कुणालाही पैसे दिले नाहीत. मोदी यांनी नोकऱ्यांचे आश्वासन दिले; पण तेही पूर्ण केले नाही. पंतप्रधान अशाप्रकारे खोटे बोलतात, ते खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी टीका खर्गे यांनी केली.
निवडणुकीच्या वेळी हे लोक येतात. खोटी आश्वासने देतात. लोकांना फसवतात आणि सत्तेत येतात. सत्तेत आल्यानंतर जनतेला विसरून जातात. मोदी यांचे अदानी आणि अंबानी हे दोनच मित्रच आहे. त्यांच्यासोबत आणखीही बरेच श्रीमंत लोक आहेत. देशातील ५ टक्के लोकांकडे देशाची ६५ टक्के संपत्ती आहे, तर ५० टक्के गरिबांकडे केवळ ३ टक्के संपत्ती आहे. यावरून सत्ताधारी गरिबांना मदत करतील, की श्रीमंतांना हे बघून घ्या. या लोकांनी चोरी करून सरकार स्थापन केले आहे. हे चोरांचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. ज्यांनी ५० खोके घेतले त्यांना आता घरी बसवा, असेही ते म्हणाले.