नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील काँग्रेसचे पाच वेळा आमदार असलेले मतीन अहम यांनी आज आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. मतीन हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. दिल्ली निवडणुकीपूर्वी त्यांचे काँग्रेस सोडून जाणे मोठे नुकसान मानले जात आहे.
‘आम आदमी पक्षा’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतीन यांच्या घरी जाऊन त्यांचा पक्षात समावेश केला. या वेळी दिल्ली सरकारचे मंत्री इम्रान हुसैन हेदेखील उपस्थित होते. केजरीवाल स्वतः मतीन यांच्या घरी गेले. त्यामुळे आगामी विधानसभेचे तिकीट त्यांच्या कुटुंबीयांसाठी निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ५ वेळा आमदार राहिलेले चौधरी मतीन अहमद यांनी आज ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांच्या उपस्थितीत ‘आप’मध्ये प्रवेश केला.
मतीन यांची या भागात मोठी पकड मजबूत आहे. ते १९९३ ते २०१५ दरम्यान पाच वेळा सीलमपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. ते दिल्ली जल बोर्डाचे माजी उपाध्यक्षही राहिले आहेत. शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना त्यांना दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. दिल्लीतील मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेल्या सुमारे दहा विधानसभा मतदारसंघात त्यांची पकड चांगली मानली जाते. दिवाळीच्या मुहूर्तावर मतीन यांचा मुलगा चौधरी झुबेर आणि काँग्रेसचे बाबरपूर जिल्हाध्यक्ष आणि चौहान बांगर येथील काँग्रेस नगरसेवक शगुफ्ता चौधरी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.