विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सर्वसामान्य माणसांपेक्षा काही माणसे निश्चितच आगळेवेगळी असतात. आपल्या अचाट साहसाने, पराक्रमाने आणि अनोख्या कार्याने ते वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करतात. जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी केलेले विक्रम सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. कुणी गिर्यारोहण करून तर कुणी सागरी जलतरण करून विश्वविक्रम करतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी देखील असेच विश्वविक्रम केले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर ९ वेळा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्व विक्रम नोंदविण्यात आला आहे.
कॉम्प्युटर ऑपरेटर विनोदकुमार चौधरी यांचे काम डेटा रेकॉर्ड करणे असून ते यासाठी संगणक की बोर्डवर काम करतात. पण वेगातला त्यांचा उत्कटपणा असा आहे की, त्यांनी टाइपिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर नऊ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. विनोद (वय ४१) हे सध्या युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस (एसईएस) मध्ये संगणक ऑपरेटर आहेत. त्यांनी कोविड -१९ व लॉकडाऊन दरम्यान गेल्या वर्षी नवीन विक्रम नोंदविला.
सन २०१९ मध्ये विनोद यांच्या नावावर सर्वात वेगवान टायपिंगची नोंद होती. याशिवाय डोळे बंद करून टायपिंग करणे, नाकाने टायपिंग करणे आणि तोंडात लाकडाचा तुकडा ठेऊन टाईप करणे या बाबतीत वेगवान प्रकाराचा विक्रम देखील त्यांच्याकडे आहे. ते आपल्या घरात गरीब आणि दिव्यांग मुलांसाठी संगणक केंद्र चालवितात. तेथील भिंतींवर त्याने नोंदवलेल्या नोंदींची छायाचित्रे आहेत.
त्यांनी सांगितले की, मला नेहमीच वेगात रस असतो. लहान असताना मला खेळाची खूप आवड होती. पण आरोग्याविषय समस्येच्या कारणास्तव मोठेपणी मला त्यात पुढे जाणे शक्य नव्हते. त्यानंतर मला संगणकावर वेगाने काम करण्याविषयी आवड निर्माण झाली. मी २०१४ मध्ये प्रथम विक्रम केला, जेव्हा मी ४४.३० सेकंदात माझ्या नाकातून १०३ वर्ण टाईप केले. या प्रकारच्या टायपिंगमध्ये हा सर्वात कमी वेळ होता. तसेच ते म्हणाले की, त्याचा आणखी वेगळा विक्रम म्हणजे एका मिनिटात एका हाताने टेनिस बॉलला स्पर्श करण्यासाठी सर्वाधिक वेळा नोंदविला आहे. एका मिनिटात ते २०५ वेळा असे करू शकतात, वास्तविक या विश्वविक्रमासाठी ऑफर करण्यात आले तेव्हा केवळ १०८ वेळा असे करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर होते.