नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुसऱ्या पत्नीपासून जन्मलेल्या सावत्र मुलाला वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा नोकरी नाकारता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा मुलाला कामावर ठेवण्यास नकार देणे हे घटनेच्या कलम १६ (२)चे घोर उल्लंघन आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने रेल्वेतील मृत रेल्वे कर्मचारी जगदीश यांच्या मुलाला नोकरी देण्याचा विचार करण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत. ज्याचा जन्म जगदीशच्या दुसऱ्या पत्नीपासून झाला आहे. रेल्वेची २ जानेवारी १९९२ रोजीची अधिसूचनेमध्ये केवळ पहिल्या पत्नीच्या मुलालाच अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबत आहे. पण हे अतिशय भेदभाव निर्माण करणारे आहे.
हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १६मध्ये हे देखील स्पष्ट आहे की जर एखाद्या हिंदू पुरुषाने पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केले आणि तिच्यापासून मूल जन्माला आले तर त्यालादेखील पहिल्या पत्नीच्या मुलांना मिळणारे हक्क मिळतील. अशा मुलाला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. ज्या नातेसंबंधातून मूल जन्माला आले त्या नात्याला बेकायदेशीर म्हणता येऊ शकते, परंतु मूल हे बेकायदेशीर असू शकत नाही. रेल्वेच्या २ जानेवारी १९९२च्या वादग्रस्त परिपत्रकात म्हटले आहे की, जर एखाद्या कर्मचाऱ्याने प्रशासनाच्या परवानगीशिवाय दुसरे लग्न केले तर त्याला नोकरीसह रेल्वे सुविधा दिली जाणार नाही. या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना दुसऱ्या पत्नीच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी नाकारता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.