पुणे – टीईडी परीक्षा घोटाळ्यात अटक करण्यात आलेले महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे चांगलेच अडचणीत सापडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सुपे यांच्या घराची पुणे पोलिसांनी झडती घेतली आहे. त्यात मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी त्यांच्या घरी दुसऱ्यांदा धाड टाकली आहे.
पहिल्या धाडीत सुपे यांच्या घरातून ८८ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. तर, आता दुसऱ्या धाडीत सुपे यांच्या घरातून जवळपास सव्वा दोन कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, जवळपास दीड किलो सोन्याचे दागिनेही पोलिसांना मिळाले आहेत. यासंदर्भात पुणे पोलिसांनी सांंगितले आहे की, आम्ही धाड टाकण्यापूर्वीच सुपे यांच्या पत्नी आणि मेहुण्याने ही सर्व रक्कम व सोने दुसरीकडे ठेवले होते. मात्र, आता कसून तपास केल्यानंतर ते सापडले आहे.
सुपे यांना काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा कसून तपास सुरू आहे. त्यांच्या चौकशीत आढळलेल्या बाबी आणि त्यानंतर त्यांच्या घराची झडती याकतून पोलिसांना मोठे पुरावे मिळाल्याचे बोलले जात आहे. सुपे यांच्याबरोबरच शिक्षण आयुक्तांचा सल्लागार असलेल्या अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगितले जात आहे. आता यापुढे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.