पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भ्रष्ट अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या जागेवर ज्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती, त्याच अधिकाऱ्याची आता फसवणुकीच्या प्रकरणात हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्य सरकारने या महिला अधिकाऱ्याबाबत हा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पण ज्या कारणासाठी त्या चर्चेत होत्या त्यासाठी त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नव्हती. मात्र अखेर पाच महिन्यांनी सरकारने त्यांचे निलंबन केले आहे. शिक्षण विभागात नोकरी लावून देण्यासाठी लोकांकडून पैसे घेणे व त्यांची फसवणूक करणे असा त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्यावर पाच महिन्यांपूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. डीएड झालेल्या शिक्षकांकडून १२ लाख रुपये तर बीएड झालेल्या शिक्षकांकडून १४ लाख रुपये घेण्यात आले होते.
राज्यभरातील ४५ शिक्षकांकडून पैसा उकळल्यानंतर त्यांना नोकऱ्या लावून देण्यातही त्या अपयशी ठरल्या होत्या. त्यामुळे पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी शैलजा दराडे व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. हडपसर पोलिसांनी दोघांविरुद्धही गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे शैलजा दराडे या शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असतानापासून अर्थात १५ जून २०१९ पासून हा प्रकार सुरू होता, असे सांगण्यात येत आहे.
भ्रष्टांच्या जागेवर भ्रष्टच
काही महिन्यांपूर्वी राज्य शिक्षण परीषदेच्या दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर त्या जागेवर शैलजा दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. पण स्वतः दराडे देखील भ्रष्टच निघाल्याने आता नवी नियुक्ती करताना सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.