विशेष प्रतिनिधी, पुणे
वेगवेगळ्या सुविधा देत जास्तीत जास्त ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाहन कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. नवे फिचर्च उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. त्यामुळे इतर कंपन्यांसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत.
फॉक्सव्हॅगन ही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मोटार कंपनी भारतीय बाजारात Virtus नावाची नवी सेडान (विशिष्ट रचना असलेली कार) लाँच करणार आहे. या कारचे नुकतेच भारतीय रस्त्यांवर परीक्षण करण्यात आले. अनेक आंतरराष्ट्रीय बाजारात Virtus पोलो सेडानने (ज्यांना व्हेंटोच्या रूपातही ओळखले जाते) कारची जागा घेतलेली आहे. त्यामुळे ही कार सध्याच्या व्हेंटो कारची जागा घेऊ शकते.
Virtus चे एक डाव्या हाताचे मॉडेल पुण्यात पाहण्यात आले. २०२२ अखेरपर्यंत कंपनीकडून कार लाँच करण्याची शक्यता आहे. ही कार VW समुहाच्या मॉड्युलर MQB A0 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. Virtus भारतात उपलब्ध असलेल्या Vento कारपेक्षा खूपच लांब असेल.
दोन इंजिन मिळणे शक्य
दोन इंजिन पर्यायांसोबत Virtus सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिले इंजिन १.६ लिटर, चार सिलिंडर MSI इंजिन असेल. ते ११७hp ची शक्ती आणि १६२ Nm चे टॉर्क उत्पादन करू शकणार आहे. तर दुसर्या पर्यायात १.० लिटर, तीन सिलिंडर, टर्बो पेट्रोल TSI इंजिनचा समावेश आहे. ते १२८hp ची शक्ती आणि २०० Nm चा टॉर्क उत्पादित करू शकणार आहे. दोन्ही इंजिन ६ स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्ससह उपलब्ध असतील. काही निवडक बाजारांमध्ये १.६ लिटर ५ स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्ससुद्धा उपलब्ध आहे.
इतर वाहनांसमोर आव्हाने
ताइगुन एसयूव्ही लाँच झाल्यानंतर फॉक्सव्हॅगन इंडियातर्फे या वर्षाखेरपर्यंत व्हेंटोच्या जागी सेडान लाँच केली जाऊ शकते. याचाच अर्थ नवी सेडान भारतात २०२२ च्या सुरुवातील लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार लाँच झाल्यानंतर होंडा सिटी, ह्युंदई वरना, मारुती सुझुकी सियाझ आणि टोयोटा यारिस या वाहनांना चांगलेच आव्हान देणार आहे.