नवी दिल्ली – कोविड या जागतिक महामारीतून सावरत असतानाच आता देशातील अनेक राज्यात डेंग्यूसारखे डासांद्वारे फैलावणारे आजार डोके वर काढत आहेत. या परिस्थितीशी निपटण्यासाठी सर्व राज्य सरकारांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सोबतच केंद्र सरकारकडून आता डेंग्यूचा बंदोबस्त करण्यासाठी लस निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. डेंग्यूची लस दृष्टिपथात असून, ती लवकरच वापरात येईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
डेंग्यूच्या लशीबाबत आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव सांगतात, देशात डेंग्यूची लस तयार करण्याचा सरकारचा महत्त्वाचा अजेंडा आहे. काही कंपन्यांना डेंग्यू स्ट्रेनसंदर्भात लस तयार करण्याचा परवाना दिलेला आहे. यापैकी काही कंपन्यांनी परदेशात लशीचे पहिले परीक्षण केले आहे.
मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत डेंग्यू आणि इतर आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राजधानी दिल्लीत सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे एकूण १४९ रुग्ण आढळले आहेत. केंद्र सरकारने १८ सप्टेंबरला एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये ११ राज्यांमध्ये आढळलेल्या Serotype-2 या डेंग्यूच्या स्ट्रेनबाबत गंभीर चर्चा करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे गुरुवारी डेंग्यूचे १७१ रुग्ण आढळले आहेत. ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर मृत्यू व्हायरल तापामुळे होत असल्याची माहिती आग्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण कुमार श्रीवास्तवर यांनी दिली.
उत्तर प्रदेशमधील अलीगढ जिल्ह्यात डेंग्यू आणि साधारण तापाच्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये गुरुवारी १५० रुग्ण दाखल झाले होते. ६० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले तर इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उत्तराखंडमधील डेहराडून येथे पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या डासांना अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. डेहराडूनमध्ये बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले असून त्यातील ६० टक्के रुग्ण सप्टेंबर महिन्यातील आहेत.