पुणे – इन्स्टंट मेसेज पाठविण्याच्या क्षेत्रात व्हॉट्सअॅप उंचच उंच भरारी घेत असल्याचे त्याच्या कार्यशैलीवरून दिसत आहे. नवनवे फिचर कार्यान्वित करून लोकप्रियता मिळविण्यात सध्या कोणतेच अॅप व्हॉट्सअॅपचा हात पकडू शकत नाही. या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने नवी प्रायव्हेट पॉलिसी जाहीर केली होती. या पॉलिसीवर कोट्यवधी युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल किंवा टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे युजर वळाले होते. परंतु व्हॉट्सअॅपने काहीशी माघार घेत नव्या पॉलिसीचे दुष्परिणाम होणार नाही असे जाहीर केले आणि युजर्सचा पुन्हा विश्वास संपादन केला. आता व्हॉट्सअॅप नवे फिचर आणत असून त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हॉट्सअॅपने नुकतेच जागतिक पातळीवर अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी एक मल्टि डिव्हाइस सपोर्ट प्रसिद्ध केले आहे. मेटाचा मालकी हक्क असलेला हा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता कम्युनिटीज नावाच्या फिचरवर काम करत आहे. नावावरूनच दिसत आहे की हे फिचर ग्रुप अॅडमिनच्या हातात अधिक अधिकार आणि नागरिकांना एकत्र जोडण्याची परवानगी देणार आहे.
सिग्नल, टेलिग्रामसमोरील आव्हान वाढणार
व्हॉट्सअॅप कम्युनिटीज फिचरबाबत पूर्वी एक्सडीए डेव्हलपर्सतर्फे माहिती देण्यात आली होती. आता WABetaInfo कडूनही याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरविल्यानंतर लोकप्रियता मिळवणार्या सिग्नल आणि टेलिग्राम या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्याचेही व्हॉट्सअॅपचे लक्ष्य आहे. कम्युनिटीज फिचर ग्रुप अॅडमिनला अधिक ताकद देणार आहे. हे फिचर ग्रुप अॅडमिनला ग्रुपच्या आत ग्रुप बनविण्याची क्षमता देणार आहे. असे बोलले जात आहे.
असे काम करणार नवे फिचर
कम्युनिटीज फिचर अॅडमिनला कम्युनिटी इनव्हाइट लिंकच्या माध्यमातून नव्या युजर्सना इनव्हाइट करण्याची तसेच दुसर्याला कनेक्ट होण्यास सक्षम होण्याची परवानगी देणार आहे. फिचर-कम्युनिटी चॅट कशी दिसेल याबद्दल वृत्तात काहीही सांगण्यात आले नाही. हे फिचर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल असे आश्वासन देण्यात आले आहे.
सर्व चॅट राहणार सुरक्षित
एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅटसह इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा अर्थ असा आहे की प्लॅटफॉर्मवर एक्सचेंज करण्यात आलेले सर्व चॅट सुरक्षित आणि लॉक असतील. मेसेज पाठविणारे आणि मिळणारे यांच्याशिवाय कोणीही चॅट चेक करू शकणार नाही. व्हॉट्सअॅपसुद्धा कोणीही पाहू शकणार नाही. रेग्युलर व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटच्या तुलनेत कम्युनिटीच्या चॅटमध्ये एक सूक्ष्म डिझाइन बदल दिसणार आहे. कम्युनिटीज फिचर कधी कार्यान्वित करणार याबद्दल अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. हे फिचर पूर्वीपासूनच काम करत असल्याने या वर्षाअखेर किंवा २०२२ च्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे.