मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शेअर बाजारात सध्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या आयपीओवर सर्वांची नजर आहे. परंतु या आठवड्यात आणखी तीन नवे आयपीओ खुले होणार असून, गुंतवणूकदारांना नवी संधी मिळणार आहे. यामध्ये प्रुडेंट कॉर्पोरेट अॅडव्हायजरी सर्व्हिसेस, डिल्हिव्हरी आणि व्हिनस पाइप्स अँड ट्यूब्स लिमिटेड या कंपन्यांच्या आयपीओचा समावेश आहे. या आयपीओचा एकूण आकार ६ हजार कोटी रुपये असेल. एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गमावलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे.
सर्वात प्रथम प्रूडेंट कॉर्पोरेट अॅडव्हायजरी सर्व्हिसेस या कंपनीचा आयपीओ खुला होणार आहे. हा आयपीओ १० मे रोजी खुला होईल. तर डिल्हिव्हरी आणि व्हिनस पाइप्स अँड ट्यूब्स कंपनीचा आयपीओ ११ मे रोजी खुला होणार आहे. प्रूडेंट कॉर्पोरेटचा आयपीओचा आकार ५३८.६१ कोटी रुपये असेल. व्हिनस पाइप्स अँड ट्यूब्सच्या आयपीओचा १६५.४२ कोटी रुपये, आणि डेल्हिव्हरीच्या आयपीओचा आकार ५,२३५ कोटी असेल.
एलआयसीच्या आयपीओमध्ये गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आरक्षित भागाचा पूर्ण लाभ मिळाला आहे. एकूण २,९६,४८,४२७ शेअर्स गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. याच्या तुलनेत ३,०६,७३,०२० बोली लावण्यात आली होती. एलआयसीचा आयपीओ बंद होण्यासाठी आणखी एक दिवस बाकी आहे. शेअर बाजारातून मिळेल्या एकूण आकडेवारीनुसार एलआयसीला आतापर्यंत एकूण १.५९ पटीने लाभ मिळाला आहे.
तथापि, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) साठी राखीव असलेले समभाग अद्याप पूर्णपणे विकत घेतलेले नाहीत. या विभागातील आतापर्यंत ०.६७ टक्के खरेदी झाली आहे. किरकोळ गुंतवणूकदार विभागात ६.९ कोटी राखीव समभागासाठी एकूण ९.५७ कोटी बोली प्राप्त झाल्या आहेत. अशाप्रकारे किरकोळ गुंतवणूक विभागाला १.३८ पटीने लाभ मिळाला आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी राखीव विभागाला ४.४ पट आणि कर्मचाऱ्यांच्या राखीव विभागाला आतापर्यंत ३.४ पट लाभ मिळाला आहे.