मुंबई – भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव ज्या पद्धतिने गगनाला भिडले आहेत, त्यावरून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढणे अत्यंत स्वाभाविक मानले जात आहे. अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या कार खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहक आतुर झाला आहे. कित्येक दिवसांपासून ग्राहक प्रतिक्षा करीत आहेत. आता टेस्ला कंपनीच्या कारचे चार मॉडेल भारतात धडकणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्याही त्यांना मिळालेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये टेस्लाने भारतात एन्ट्री घेणार असल्याची घोषणा केल्यामुळे जास्तच चर्चा वाढली. मात्र आता त्यादृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर एका पोस्टिंकचा उल्लेख करून ब्लूमबर्गने सांगितले आहे की टेस्लाचे चार मॉडेल भारतात धावण्यासाठी प्रमाणिक करण्यात आले आहेत. टेस्लाचे चार मॉडेल भारतीय मार्केटमधील सुरक्षा आणि इतर बाबींमध्ये फिट बसणारे आहेत. या गाड्यांचे टेस्टिंग केल्यावर हे लक्षात आले आहेत की व्हेईकल इमीशन, सेफ्टी आदींच्या बाबतीतही त्या भारतातील वातावरणाशी मिळणाऱ्या आहेत. यात टेस्ला मॉडेल 3 आणि मॉडेल Y चे व्हेरियंटही सामील आहेत, असे यात नमूद करण्यात आले आहे.
टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी पहिलेच संकेत दिले होते की कंपनी भारतात एक फॅक्ट्री सुरू करू शकते. त्यासाठी टेस्लाने भारतात वाहनांची विक्री सुरू करायला हवी. ग्राहकांचा विचार करून भारतात वाहनांवर लागणाऱ्या करातही कपात करण्याचा टेस्ला विचार करीत आहे.
मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले होते की, ‘जगातील कुठल्याही देशाच्या तुलनेत भारतात आयात शुल्क जास्त आहे. या देशात इलेक्ट्रिक वाहनांनादेखील पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांप्रमाणे मानले जाते. आणि हे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही.’ टेस्लाने करात कपात करण्याची मागणी केल्यानंतर वाहन कंपन्यांकडून संमीश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
महिंद्रा कंपनीने या शुल्काची पुनर्रचना होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तर टाटा मोटर्सने सर्व इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांसाठी सरकारने सारखा व्यवहार करावा, अशी मागणी केली आहे. फॉक्सवॅगन आणि ह्युंदाईने टेस्लाच्या मागणीचे समर्थन केले आहे.
बंगळुरूमध्ये नोंदणी
टेस्ला कंपनीने अलीकडेच बंगळुरूमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमीटेड या नावाने कंपनीची नोंदणी केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे लवकरच टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारतातील रस्त्यांवर धावताना दिसलीत अशी आशा केली जात आहे.