पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आता सीएनजी वाहनाच्या शर्यतीत आपला वेग वाढविण्याची तयारी करत आहे. टाटा मोटर्स लवकरच स्थानिक बाजारात चार मॉडेल्सचे सीएनजी व्हेरिएंट सादर करणार आहे. त्यामध्ये कॉम्पॅक्ट सेडान, सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही, एंट्री लेव्हल हॅचबॅक आणि प्रीमिअर हॅचबॅक या कारचा समावेश आहे.
सीएनजी मार्केटवर आतापर्यंत मारुती सुझुकीचाच ताबा राहिला आहे. मारुती सुझुकीच्या व्हिकल पोर्टपोलिओमध्ये सर्वात जास्त ६ सीएनजी मॉडेल आहेत. परंतु आता टाटा मोटर्स आपल्या कार सीएनजी किटसोबत सादर करणार आहे. त्यामध्ये टिगोर सेडान, नेक्सॉन, टिएगो आणि अल्ट्रॉजसारख्या कारचा समावेश आहे. या कारचे अनावरण कधी करणार याबाबत अद्याप कंपनीकडून घोषणा करण्यात आलेली नसली तरी यापैकी काही कारचे परीक्षण करताना पाहण्यात आले आहे.
Altroz CNG या कारचे नुकतेच पुण्याच परीक्षण करण्यात आले. या कारच्या काही निवडक व्हेरिएंट्सना कंपनी फिट केलेल्या सीएनजी किट्ससह सादर करणार आहे. सध्याच्या परिस्थितीत ही कार एकूण ७ व्हेरिएंट्समध्ये मिळते. एक सीएनजी किट १.२ लिटर नॅच्युरल एस्पायर्ड इंजिनसह सादर करण्यात येणार आहे. डिझेल व्हेरिएंटमध्ये सीएनजी किट दिले जाणार नाही. कारच्या मायलेजबद्दल अद्याप कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. परंतु या कार चांगला मायलेज देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जाणकारांच्या मते पेट्रोल-डिझेल व्हेरिएंटच्या तुलनेत सीएनजी कार ५० हजारांनी महाग असू शकते. सणासुदीच्या दिवसांत ही कार पाच लाख रुपयांमध्ये सादर केली जाऊ शकते.