नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या अवतारांमुळे सध्या महामारीचे अक्राळविक्राळ रूप दिसत आहे. या अवतारांमध्येही नवे म्युटेशन तयार होत असल्याने शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान निर्माण होत आहे. महामारीच्या सर्व व्हेरिएंटवर एकच रामबाण इलाज शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचे काम सुरू असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
कोरोनाच्या नव्या अवतारांचे आव्हान समोर असताना एक सकारात्मक बातमी आली आहे. कोरोना विषाणूपासून निर्माण होणार्या नव्या महामारींपासून संरक्षण करणारी सुपर व्हॅक्सिनच्या जवळ शास्त्रज्ञ पोहोचले आहेत. तिचे उंदरांवर यशस्वी परीक्षण झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारची लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाने ही लस तयार केली आहे. विद्यापीठाच्या या संशोधनाला सायन्स नियतकालिकेत प्रकाशित केले आहे. शास्त्रज्ञांच्या या संशोधनाला दुसर्या पिढीची लस असे संबोधण्यात आले आहे. ही लस कोविड-१९ आणि कोरोनाच्याच कुटुंबातील सगळ्या घातक विषाणूंविरोधात लढण्यास उपयुक्त ठरणार आहे. परीक्षण झालेले उंदीर सार्स कोव्ह आणि कोरोनाच्या दुसर्या व्हरिएंटने संक्रमित होते. पुढील वर्षापर्यंत या लशीचे माणसांवर परीक्षण करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूचा कोणताही नवा अवतार भविष्यात नव्या महामारीला जन्म देऊ शकतो. या धोक्याला रोखण्यासाठी ही लस तयार करण्यात आली आहे. उंदरांवर केलेल्या परीक्षणात लशीमुळे तयार झालेल्या अँटिबॉडी स्पाइक प्रोटिनविरुद्ध परिणामकारक सिद्ध झाल्या आहेत. दक्षिण अफ्रिकामध्ये आढळलेल्या बी.१.३५१ व्हेरिएंटवरसुद्धा या लशीचा खूपच प्रभाव दिसला.
स्पाइक प्रोटिन
कोरोना विषाणूच्या बाहेरील पृष्ठभागावर काट्यासारख्या दिसणार्या भागातून प्रोटिन निघतो. त्याला स्पाइक प्रोटिन असे म्हणतात. याच प्रोटिनमधून संसर्ग सुरू होतो. ते माणसाच्या एंजाइम एसीई २ रिसेप्टरशी संबंधित फुफ्फुसात पोहोचतो. सख्या वाढवून संसर्ग वाढतो.