इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपली मूल्ये सांभाळत कोणत्याही क्षेत्रात काम करणे हे फार कमीजणांना जमते. मनोरंजन विश्वात अशाप्रकारे मूल्ये जप्त काम करणे मुश्कीलच असते. तरीही आपली मूल्ये, तत्त्वे सांभाळत काही कलाकार आपलं काम नेटाने करतात. पैसे की तत्त्व असा विषय आल्यावर त्यांच्यासाठी त्यांची मूल्येच कायम श्रेष्ठ ठरतात. अशा कलाकारांमध्ये अभिनेत्री साई पल्लवी हिचे नाव अग्रस्थानी असेल. तिचं हेच वैशिष्ट्य तिला सर्वांपासून वेगळे ठरवते. दाक्षिणात्य अभिनेत्री असलेली साई लवकरच बॉलीवूडमध्ये येऊ घातली आहे. बॉलिवूडचा हँडसम हंक रणवीर कपूरसोबत साई दिसू शकते. साईचे चाहते तिला हिंदी चित्रपट सृष्टीत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. साई पल्लवीचं पूर्ण नाव साई पल्लवी सेंथामराय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड निर्माता मधू मंटेना यांनी रामायणावरील सिनेमासाठी साई पल्लवीला विचारणा केली आहे. साईने या चित्रपटाला होकार दिलाच तर ती या चित्रपटात सीतेची भूमिका साकारताना दिसेल. तर रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत असेल. रामायणावर आधारित ‘आदिपुरूष’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे. यात साऊथ सुपरस्टार प्रभास प्रभू रामचंद्राच्या भूमिकेत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान या चित्रपटात रावणाची भूमिका साकारतो आहे. आता याच कथेवरचा आणखी एक सिनेमा मधु मंटेना साकारू इच्छित आहेत.
तत्त्वांशी प्रामाणिक अशी साईची ओळख आहे. काही वर्षांआधी साईला एका फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्याची ऑफर होती. काही मिनिटांच्या या जाहिरातीसाठी तिला २ कोटी मिळणार होते. पण साईने ही ऑफर धुडकावून लावली. केवळ पैशांसाठी फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास तिने नकार दिला. मी कधीच सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात करत नाही. मला ते मान्यच नाही. तुम्ही जसे असाल तसे स्वत:ला स्वीकारा, जग तुम्हाला आपोआप स्वीकारेल, असं ती म्हणते.
साई पल्लवीबद्दल सांगायचं तर २०१५ मध्ये ‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटातून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिलं. पहिल्या चित्रपटानंतर साई एका रात्रीत स्टार झाली. पण हे स्टारडम डोक्यात जाऊ न देता तिने तिचं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली.
Coming Soon Ramayan Movie Ranbir Kapoor Ram
Sai Pallavi Entertainment