विशेष प्रतिनिधी, पुणे
मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍप कायमच काही ना काही नवीन फीचर आणून आपल्या युझर्सना वेगळे काही देण्याचा प्रयत्न करत असते. या नवीन फीचरचे नाव आहे, स्टीकर सजेशन. या फीचरअंतर्गत तुम्हाला एखाद्या शब्दासाठी स्टीकरचे सजेशन देण्यात येईल. व्हॉट्सऍपच्या नवीन फीचर्सना ट्रॅक करणाऱ्या वेब बीटा इन्फोने ही माहिती दिली आहे.
तुम्ही एखादा मेसेज टाईप करत असाल, त्यादरम्यान जर एखाद्या शब्दासाठी चांगला समर्पक स्टीकर असेल, तर व्हॉट्सऍपकडूनच त्याची सूचना दिली जाईल. या फीचरची सध्या चाचणी सुरू आहे. लवकरच अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी हे फीचर लाँच केले जाईल.
याशिवाय, आणखी एक नवीन फीचर युझर्ससाठी आणण्यात येणार आहे. डिसऍपिअरिंग मेसेज हे फीचर अपग्रेड करण्यात येणार आहे. अपग्रेड झाल्यानंतर या फीचरमधील ७ दिवसांचा कालावधी २४ तासांवर येणार आहे. म्हणजेच, तुम्ही जर हे फीचर ऍक्टिव्हेट केले असेल तर २४ तासांनंतर तुमचे व्हॉट्सऍपवरील मेसेज आपोआप डिलीट होऊन जातील. सध्या हे फीचर सात दिवसांसाठी उपलब्ध आहे. या फीचरच्या अपग्रेडेशनची चाचणी सध्या सुरू असल्याचे वृत्त वेब बिटा इंफोने दिले आहे. लवकरच अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी हे फीचर आणले जाण्याची शक्यता आहे.
मार्च २०२१ मध्ये व्हॉट्सऍपने म्युट व्हिडीओ हे नवीन फीचर आणले. या फीचरच्या माध्यमातून युझर्स व्हिडीओ पाठवण्याच्या आधी तो म्यूट करू शकतात. म्हणजेच, आपला व्हिडीओ दुसऱ्याकडे गेल्यावर त्याला त्याचा आवाज ऐकू येत नाही. बऱ्याच काळापासून व्हॉट्सऍप या फीचरवर काम करत होते.