मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर आता भारतीय वाहन उद्योग आणि भारतीय वाहन बाजारपेठ यांना चांगले दिवस आले आहेत. किंबहुना काही काळ मंदीनंतर आता वाहन उद्योगात तेजी दिसून येत आहे. तसेच ग्राहकांना किंवा वाहनधारक आणि प्रवाशांना अपेक्षित अशी वाहने तयार करण्याचा अनेक कंपन्यांचा कल दिसून येतो. यात महिंद्रा कंपनीने बाजी मारलेली दिसते, कारण लांबच्या प्रवासात वाहनधारक आणि प्रवाशांना अपेक्षित सोयी सुविधा देण्यासाठी महिंद्राने नवीन वाहन लाँच केले आहे. या आकर्षक आणि उपयुक्त वाहना विषयी उत्सुकता दिसून येत आहे.
महिंद्रा कंपनी भारतीय बाजारपेठेत बजेट फ्रेंडली लक्झरी कॅम्पर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. हे नवीन वाहन महिंद्रा बोलेरोवर आधारित असेल. यासाठी महिंद्रा अँड महिंद्राने आयआयटी मद्रासच्या कारवाँ मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ही पहिलीच वेळ आहे की एखादी भारतीय ऑटोमोटिव्ह कंपनी कारवाँ विभागात प्रवेश करणार आहे. या वाहनांच्या चालकाला कोणत्याही विशेष परवान्याची किंवा कौशल्याची गरज भासणार नाही. तसेच टूर ऑपरेटर ही वाहने भाड्याने देऊ शकतील.
एका प्रेस स्टेटमेंटमध्ये, महिंद्राने सांगितले की, बोलेरो गोल्ड कॅम्पर लक्झरी कॅम्परमध्ये स्मार्ट वॉटर सोल्युशन्स, सुंदर डिझाइन केलेले फिटिंग्ज आणि सर्व प्रवाशांसाठी आरामदायक इंटिरियरसह अनेक वैशिष्ट्ये असतील. कॅम्पर ट्रकमध्ये चौघांसाठी झोपण्याची सोय, चौघांसाठी बसण्याची आणि जेवणाची सोय, बायो-टॉयलेट आणि शॉवरसह टॉयलेट, मिनी-फ्रिज आणि मायक्रोवेव्हसह स्वयंपाकघर आणि एअर कंडिशनर प्रदान केले जाईल.
याबाबत महिंद्रा ऑटोमोटिव्हचे उपाध्यक्ष (मार्केटिंग ) हरीश लालचंदानी म्हणाले की, महिंद्राचा या विभागातील आमचा प्रवेश हा प्रवासी नागरिकांच्या गरजा पूर्ण करतो. या उच्च दर्जाच्या कॅम्पर ट्रक्सची निर्मिती करण्यासाठी आमचा कॅम्पर व्हॅन फॅक्टरीशी टाय-अप आहे. हे वाहन भारतातील प्रवासी व पर्यटन उद्योगासाठी वरदान ठरेल.