अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गेल्या काही वर्षांपासून वाहनांमध्ये वेगवेगळे प्रयोग बघायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनांचा तुटवडा तसेच त्यातून होणारे प्रदूषण पाहता वेगळ्या पद्धतींच्या वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. इलेक्ट्रीक वाहनांचा त्यात समावेश आहेच, शिवाय आता हायड्रोजन इंधन असलेली वाहनांकडेही पर्याय म्हणून पाहिले जाणार आहे. याच धर्तीवर भारतातील पहिली हायड्रोजन इंधन असलेली कार लाँच करण्यात आली आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही कार लॉन्च केली आहे.
टोयोटा कंपनीच्या पायलट प्रकल्पांतर्गत लाँच करण्यात आलेल्या या कारमध्ये प्रगत इंधन सेल बसवण्यात आले आहे. जो ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मिश्रणातून वीज निर्माण करतो आणि या विजेवर ही कार चालते. या कारमधून फक्त पाणी उत्सर्जनाच्या स्वरूपात बाहेर येते. या कारच्या वैशिष्ट्यांविषयी नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ही कार पूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. हरित हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे, त्यामुळे अक्षय ऊर्जेच्या साहाय्याने ते सहज बनवता येऊ शकते आणि त्यासाठी आवश्यक रसायनं देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ज्या वाहनांना बॅटरी चार्ज करण्यासाठी बराच वेळ लागतो किंवा ज्या वाहनांच्या बॅटरीचे वजन जास्त आहे, अशांमध्येही हायड्रोजन सहज वापरता येईल.
हायड्रोजन इंधन कार बनवणाऱ्या टोयोटा कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या कारमधील हायड्रोजन टाकी पाच मिनिटांत पूर्ण होईल आणि एकदा टाकी भरली की ती सहज ६०० किलोमीटर चालवता येईल. यावेळी उपस्थित असलेले ऊर्जा मंत्री आरके सिंह म्हणाले की, एनटीपीसीला दिल्ली ते आग्रा आणि दिल्ली ते जयपूर दरम्यान हायड्रोजन इंधनावर आधारित अल्ट्रा लक्झरी बस चालवण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडेही उपस्थित होते.
पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, ग्रीन हायड्रोजनची किंमत एक डॉलरपर्यंत खाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तथापि, मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यानंतरच हे शक्य होईल. देशातील ग्रीन हायड्रोजनची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व रिफायनरींना ग्रीन हायड्रोजनचा वापर सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. सध्या रिफायनरीमध्ये राखाडी हायड्रोजनचा वापर केला जात आहे. गडकरी म्हणाले की, हायड्रोजनची किंमत एक डॉलरच्या पातळीवर असताना देशात स्वस्तात ऊर्जा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.