मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात लवकरच शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु होणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वित्त विभागाला दिले आहेत. राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही सुद्धा डॉ. टोपे यांनी दिली आहे.
शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास तातडीने सादर करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (क्र.108) रुग्णवाहिकांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी त्यासंदर्भात असलेले न्यायालयाचे निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाचे मत नोंदण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्याशी होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सीसीएमपी कोर्स केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी मिळण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.