इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून सध्या समाजमाध्यमासह विविध ठिकाणी चर्चा होत आहे. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट आवडत आहे, तर काही नागरिक या चित्रपटाला विरोध करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटात दाखवलेल्या सत्य घटनांपासून पळ काढता येणार नाही. द काश्मीर फाइल्सच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे दुःखद चित्रण मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आता बॉलिवूड दिग्दर्शक विनोद कापडी यांनी मोठी घोषणा केली आहे. गुजरात दंगलीवर गुजरात फाइल्स नावाचा चित्रपट बनवणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासोबतच विनोद कापडी यांनी पंतप्रधानांना काही प्रश्नही विचारले आहेत.
विनोद कापडी यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आणि लिहिले, की गुजरात फाइल्स नावाने मी तथ्याच्या आधारावर, कलेच्या आधारावर चित्रपट बनवण्यास तयार आहे. त्यामध्ये तुमच्या भूमिकेचाही सत्यतेने विस्ताराने उल्लेख केला जाईल. चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखला जाणार नाही, हा विश्वास तुम्ही मला देशासमोर देऊ शकता का नरेंद्र मोदीजी?
दुसऱ्या ट्विटमध्ये विनोद कापडी यांनी लिहिले, की माझ्या या ट्विटनंतर काही निर्मात्यांशी माझे बोलणेही झाले आहे. ते गुजरात फालल्स चित्रपट निर्मिती करण्यास तयार आहेत. फक्त ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पंतप्रधान उल्लेख करत आहेत, असाच विश्वास या चित्रपटांनाही द्यावा, असे आश्वासन या निर्मात्यांना हवे आहे.
विनोद कापडी यांचे हे दोन ट्विट खूपच व्हायरल होत आहेत. विनोद कापडी यांनी मिस टनकपूर हाजिर हो आणि पिहू हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ट्विटमुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. लॉकडाउनदरम्यान त्यांनी १२३२केएम नावाची एक डॉक्युमेंट्री बनवली होती. ही डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
#GujaratFiles के नाम से मैं “तथ्यों के आधार पर पर , आर्ट के आधार पर” फ़िल्म बनाने को तैयार हूँ और उसमें आपकी भूमिका का भी “सत्यता” से ,विस्तार से ज़िक्र होगा ।
क्या आप आज देश के सामने मुझे भरोसा देंगे कि फ़िल्म का रिलीज़ नहीं रोकेंगे @narendramodi जी ? https://t.co/X13hfvUKAM
— Vinod Kapri (@vinodkapri) March 15, 2022