मुंबई – कोरोना विषाणूला देशात रोखण्यासाठी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला आणखी बळ मिळणार आहे. जास्तीत जास्त लोकांना लस मिळण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आणखी दोन लशींचा समावेश होऊ शकतो. आपत्कालीन वापरासाठी या आठवड्यात दोन लशींना सरकारकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये झायडस कॅडिला कंपनीची झायकोव्ह डी लस आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीची कोवावॅक्स या लशीचा समावेश आहे.
भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय)च्या विशेष समितीची बुधवारी होणार्या बैठकीत तीन लशींबाबत चर्चा होणार आहे. यामध्ये बायोलॉजिकल ई कंपनीच्या लशीचा समावेश आहे. परंतु यापैकी दोन लशींनी या आठवड्यात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
समितीचे वरिष्ठ सदस्य सांगतात, पाच आठवड्यापूर्वी झायडस कंपनीने डीएनए आधारित स्वदेशी लशीसाठी अर्ज दिला होता. परंतु तिसर्या परीक्षणाशी संबंधित निष्कर्ष पुरेसे नव्हते. त्यामुळे इतर कागदपत्रे सुपूर्द करण्यास कंपनीला सांगण्यात आले होते. गेल्या आठवड्यात कंपनीकडून सगळी कागदपत्रे प्राप्त झाली होती. कागदपत्रांची पडताळणीही झालेली आहे.
कोवावॅक्स नावाने ज्या लशीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अर्ज केला होता, त्याच लशीसाठी इतर देशांमध्ये नोवावॅक्स कंपनीने परवानगी मागितली आहे. आतापर्यंत या तिन्ही निष्कर्षांच्या आधारावर काही देशांमध्ये परवानगी मिळालेली आहे. दोन लशींना सर्वात आधी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतात स्पुटनिक-व्ही, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीच्या एका डोसच्या वापराला परवानगी मिळालेली आहे.
बालकांसाठी लवकच लस
मुलांसाठी कोवावॅक्स लशीच्या तिसर्या टप्प्याच्या बॅचला कसौलीच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेतून मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या नोवावॅक्स कंपनीच्या कोवावॅक्स लशीच्या तिसर्या टप्प्याची बॅच मंजुरी मिळवून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पाठविण्यात आली आहे. या वर्षी सीरमकडून लशीचे उत्पादन केले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात कंपनीने सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे. आता १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर तिसर्या टप्प्याचे परीक्षण सुरू झाले आहे. ही लस इतर व्हेरिएंटवरही परिणामकारक असेल. कोवावॅक्सच्या लशीचा डोस हाताच्या दंडावरच दिला जाणार आहे.
लसीकरणाची मंद गती
देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असूनही खूपच मंद गतीने लसीकरण सुरू आहे. गेल्या एका दिवसात १६ लाख लोकांनी लस घेतली आहे. इतर दिवसात हा आकडा ५० ते ६० लाखांपर्यंत नोंदवला गेला आहे. केंद्राने राज्यांसाठी ८ लाखांहून अधिक डोसची नवी खेप पाठविली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, राज्यांना आतापर्यंत ५२.४० कोटींहून अधिक डोस पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये ५०.५२ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सध्या राज्यांकडे २.३३ कोटींहून अधिक डोस आहेत.