चंडीगढ – हरियाणा कर्मचारी निवड आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या (महिला-पुरुष) लेखी परीक्षेत विचारलेल्या विचित्र प्रश्नांमुळे परीक्षार्थी चांगलेच बुचकळ्यात पडल्याचे पाहायला मिळाले. हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांच्या वेगळेपणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायात अविवाहित असा शब्दही देण्यात आला होता.
कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष भोपाल सिंह यांच्या खदरी या गावाबद्दलसुद्धा प्रश्न विचारताना खदरी हा शब्द कोणत्या जात, समाज, गोत्राशी संबंधित आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर परीक्षार्थींनी आक्षेप घेतला आहे. या परीक्षेच्या ७१ व्या प्रश्नात गृहमंत्री अनिल वीज यांचे वेगळेपण विचारण्यात आले. या प्रश्नाच्या उत्तरात चार पर्याय देण्यात आले. पहिला उच्च शिक्षित आहेत, दुसरा पूर्वीही गृहमंत्री राहिले आहेत, तिसरा अविवाहित आहेत, चौथा पोलिस अधिकारी राहिलेले आहेत. याच परीक्षेत ६६ वा प्रश्न हरियाणा कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष भोपाल सिंह यांच्या खदरी या गावासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. खदरी म्हणजे काय आहे? उत्तरात चार पर्याय देण्यात आले. त्यामध्ये पहिला जातीने नाव, दुसरा समाज, तिसरा गोत्राचे नाव आणि चौथा खादर क्षेत्रामुळे वरीलपैकी कोणतेच नाही.
परीक्षार्थी आक्षेप नोंदविणार
अनेक परीक्षार्थींनी या प्रश्नांवर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, या प्रश्नांचा पोलिस उपनिरीक्षकांच्या भरतीशी काहीच संबंध नाही. हे सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न नाहीत. त्यामुळे ते आक्षेप नोंदविणार आहेत. रविवारी पोलिस उपनिरीक्षकांच्या सकाळी आणि सायंकाळी झालेल्या परीक्षेत ६८ टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिलांचा समावेश होता.