इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्व हे नावाप्रमाणेच प्रत्येकाचं मनोरंजन करतं. यातील काहीजणांना प्रेमकथा आवडतात, काहींना घरगुती तर काहींना मारधाडीचे मनोरंजन प्रिय असतं. मात्र, या सर्वांपेक्षाही सर्वाधिक प्रेक्षक ज्याला मिळतात तो प्रकार म्हणजे कॉमेडी. असं म्हणतात की, लोकांना रडवणं सोपं असतं पण, हसवणं नाही. त्यामुळेच हा प्रकार प्रेक्षकांच्या अत्यंत जवळचा आहे.
कॉमेडीचा बादशहा म्हणून जॉनी लिवर बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. गेली कित्येक वर्ष जॉनी लिवरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे, पण सध्या मात्र ते फारसे कुठेच दिसत नाहीत. याबाबत अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. आतापर्यंत जॉनी लिवर याबाबत काहीही बोलले नव्हते. आता मात्र त्यांनी याबाबतचं मौन सोडलं आहे.
भारतीय चित्रपटातील विनोदाचा घसरलेला दर्जा, उत्तम लेखकांची कमतरता आणि कॉमेडीकडे बघायचा कलाकारांचा दृष्टिकोन याविषयी जॉनी लिवर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मी स्वतः सध्या बऱ्याच भूमिकांना नकार देतो. तुम्ही बाजीगरचं उदाहरण घ्या, त्यात कोणताही कॉमेडी लेखक नव्हता, त्यातले सगळे पंचेस मीच काढले. ते दिवस खरंच खूप छान होते. सध्याच्या काळात मात्र आपल्याकडे उत्तम कॉमेडी लेखकांची प्रचंड कमतरता आहे. जॉनीभाई सांभाळून घेतील असा विचार घेऊन बरेच लोक चित्रपट करतात, पण असं नाहीये. आम्हालासुद्धा तयारीसाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.” आमच्या काळात कॉमेडीला एक सन्मान होता, आता चित्रपटात क्वचितच तुम्हाला कॉमेडी पाहायला मिळते. आधी जेव्हा मी चित्रपटात काम करायचो तेव्हा माझ्या कामाला लोकांचा एवढा प्रतिसाद यायचा की काही नट भीतीपोटी माझे सीन्स एडिट करायला लावायचे. माझ्या विनोदाला मिळणारी दाद पाहून त्यांना आपण असुरक्षित असल्याची भावना मनात यायची. हळूहळू त्या मुख्य कलाकारांनाही कॉमेडी करायची इच्छा झाली आणि मग लेखक ते सीन्स आमच्यात वाटून द्यायचे, यामुळेच नंतर माझ्या भूमिका आणखी छोट्या होत गेल्या, आणि आता तर कॉमेडी औषधालाही सापडत नाही, असे जॉनी लिवर सांगतात.
विनोदाकडे गांभीर्याने पाहणारे सध्या फारच कमी दिग्दर्शक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये त्यांनी रोहित शेट्टी या एकमेव दिग्दर्शकाचं नाव घेतलं. रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सर्कस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. मात्र, ‘सर्कस’मधील जॉनी लिवर यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
Comedy King Johny Lever on Old and Recent Movie Entertainment