इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेक्षकांना हसवणारा हास्य अभिनेता राजू श्रीवास्तव यांनी अचानक एक्झिट घेतली. आणि जाताजाता सगळ्यांना चटका लावून गेले. त्यांचं हे अचानक जाणं त्यांच्या घरच्यांना तर नाहीच पण चाहत्यांच्या पचनी पडलेलं नाही. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांनी ठरवलेल्या अनेक गोष्टी अर्धवट राहिल्या. या गोष्टी आपण पूर्ण करणार असल्याचे त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. “राजू श्रीवास्तव यांची अशी कोणती अपुरी इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करायची आहे?” असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी राजकारणात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
शिखा सांगतात की, “राजू श्रीवास्तव हे एक कलाकार होते आणि आमची दोन्ही मुलं त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते. तर मुलगा आयुष्मानला सितार वाजवण्यामध्ये रस आहे. आपल्या दोन्ही मुलांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी व्हावं, अशी राजू यांची इच्छा होती. या व्यतिरिक्त त्यांना राजकारणात खूप रस होता. त्यांना राजकारणातही बरंच काम करायचं होतं.
या आवडीतूनच राजू यांनी त्यांच्या शेवटच्या काळात राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. ते भाजपात सहभागी झाले. मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे ते ब्रँड अंबेसेडर होते. चित्रपट विकास मंडळाचेही अध्यक्ष झाले. या क्षेत्रातही त्यांना बरंच काम करायचं होतं पण त्यांच्या निधनाने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिलं. यामुळेच मला जर संधी मिळाली तर त्यांचं हे स्वप्न पूर्ण करायला मला आवडेल. पण ते कसं पूर्ण होईल याबाबत मला आत्ता कल्पना नाही, असंही शिखा सांगतात.
Comedian Raju Shrivastav wife tell her Left Will
Shikha Entertainment Politics