इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातील सर्वांत मोठे मंदिर भाग २
कम्बोडियातील अंग्कोरवाट मंदिर!
(क्षेत्रफळ १६ लाख २६ हजार चौमीटर)
सर्वाधिक हिंदू मंदिरं आपल्या भारतात आहेत. ही मंदिरं केवळ प्रार्थना स्थळच नाहीत तर आपली संस्कृती, संस्कारांची जपणूक करणारी केन्द्रं आहेत. मंदिरं बांधन्याचे अतिशय प्रगत वास्तुशास्त्र फार प्राचीन काली आपल्याकडे विकसित झाले होते. विशेष म्हणजे आपल्या देशांतच आपल्या देवांची मोठ मोठी कलाकुसरयुक्त मंदिरं आहेत असे नाही तर हिंदू संस्कृतीचा हा संपन्न ठेवा जगभर पसरलेला आहे.
सर्वाधिक जागा व्यापणारी म्हणजे ज्यांचे क्षेत्रफळ मोठे आहे या निकषानुसार जगातील दोन सर्वांत विशाल मंदिरं परदेशांत आहे.
जगभरातील मोठी मंदिरं या विशेष मालिकेत आज इंडिया दर्पणच्या वाचकांना कम्बोडियातील अंग्कोरवाट मंदिराचा परिचय करुन देणार आहोत.
जगातले हे सर्वांत विशाल,भव्य, मोठे हिंदू मंदिर 16 लक्ष 26 हजार स्क्वेअर मीटर एवढ्या भव्य जागेवर विस्तारलेले आहे. आपली भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृती मानली जाते. भारताबाहेरही आपल्या या प्राचीन भारतीय संस्कृतीची साक्ष देणारी मंदिरे आहेत. कंबोडिया या देशात असलेले अंगकोर वाट मंदिर हे जगातील सर्वात मोठा परिसर असलेले हिंदू मंदिर आहे. आजच्या या लेखात आपण अंगकोर वाट मंदिराबाबत माहिती जाणुन घेऊ या.
अंगकोर वाट मंदिर कोणी निर्माण केले?
कंबोडियामध्ये खुप मोठ्या प्रमाणात हिंदू आहेत. त्यासोबतच बौद्ध स्मारकेही बरीचशी आहेत. अंगकोर वाट मंदिर हे कंबोडियातील अंकोर या शहरात आहे. या शहराचे प्राचीन नाव यशोधरपुर असे होते. अंगकोर वाट मंदिर हे यूनेस्कोच्या जागतिक वारसा ठिकानांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. अंगकोर वाट मंदिर हे प्रामुख्याने विष्णु मंदिर आहे. असे असले तरी येथे ब्रम्ह आणि शिव यांच्याही प्रतिमा आहेत. या मंदिराचे निर्माण कार्य अंगकोरचा राजा सूर्यवर्मन द्वितीय याने बाराव्या शतकात केले. राजा सूर्यवर्मन याने आपल्या मृत्युनंतर आपले स्मारक राहावे म्हणून या मंदिराचे निर्माणकार्य केले असे म्हटले जाते. म्हणून या मंदिराला pyramid temple असेही म्हटले जाते. या मंदिराचे अद्भुत स्थापत्य आणि भव्य शिल्पकला असल्याने त्यास व्रह विष्णुलोक असेही म्हटले जात असे.
अंगकोर वाट मंदिराचा परिसर आणि बांधकाम :
अंगकोर वाट मंदिर हे वास्तविक मंदिरांचा समूह आहे. मंदिराचे बांधकाम हे कमीअधिक उंचीच्या तीन प्रांगनात केलेली आहे. अंगकोर वाट मंदिराच्या चारही बाजूंनी पाण्याची खंदके आहेत. अंगकोर वाट मंदिर हे पश्चिममुखी आहे. या मागे असे कारण सांगितल्या जाते की, वैकुंठाला जाणारा मार्ग हा पश्चिम दिशेकडे आहे. या मंदिराची रचना पुराणात उल्लेख असलेल्या मेरु पर्वताला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे.
ज्या परिसरात हे मंदिराचे बांधकाम केले आहे त्याची लांबी – रुंदी 1500 *1300 आहे. मुख्य मंदिराच्या सभोवतीला एकुण पाच गोपुरे आहेत. त्यामधील भिंतीवरील शिल्पकला खुप सुंदर आहे. मेरु पर्वतास जसे वासुकी नागाने विळखा घातलेला होता त्याचे प्रतिक म्हणजे या भिंती होत. गोपुरांच्या वरच्या भागावर ब्रम्हदेवाचे मुख कोरलेले आहे. गोपुरांच्या खालच्या भागात हत्ती कोरलेले असून प्रत्येक हत्तीच्या सोंडेत कमळाचे फूल आहे. हे दृश्य पाहून आपले मन नक्कीच भारावून जाते. या मंदिराच्या भिंतीवर आणि गोपुरांवर देवंताच्या आणि अप्सरांची शिल्पे कोरलेली आहेत. ही गोपुरे हत्ती दरवाजे म्हणूनही ओळखली जातात. कारण त्यामधून हत्ती सहज जाऊ शकतो.
गोपुरांच्या आत आल्यावर दोन लहान आकाराच्या इमारती आहेत. त्या इमारती त्यावेळी पुरोहित, पंडित वापरत असावी. त्या इमारतीमधील भिंतीवर प्राचीन ख्मेर भाषेत रामायणातील श्लोक कोरलेले आहेत. मंदिरांच्या भिंतीवर रामायणातील सीताहरण, अशोक वाटिकेत असलेले हनुमानजी, रावणाच्या दरबारातील अंगद प्रसंग कोरलेले आहेत. श्रीराम आणि रावण तसेच कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धाचे देखावे कोरलेली आहेत. त्याच बरोबर समुद्र मंथनाचा प्रसंगही कोरलेला आहे. भगवान विष्णु आणि असुर तसेच श्रीकृष्ण आणि बाणासुर यांचे युद्ध यांचेही देखावे कोरलेले आहेत. परिसरातील एका सज्ज्यात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याही मुर्त्या आढळतात. कंबोडिया या देशाने आपल्या राष्ट्रध्वजावर या मंदिराची प्रतिमा ठेवून आपल्या देशातील या प्राचीन वारशाचा उचित सन्मान केलेला आहे.
-लेखक : विजय गोळेसर 9422765227
Column Worlds Largest Temple Angkor Wat by Vijay Golesar
Kambodia Hindu