इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
वृक्षांचे पुनर्रोपण का आयोग्य
आपल्याकडे पुनर्रोपण म्हणजे ज्या झाडाचे आपल्याला पुनर्रोपण करायचं आहे त्या झाडाचा पूर्ण विस्तार छाटून फक्त 10 ते 15 फूट खोड ठेवून त्याला बोडके व खुजे केले जाते. मुळांना जास्तीत जास्त प्रमाणात पुनर्रोपण करताना झाडाबरोबर काळजीपूर्वक काढण्याची गरज असते. पण आपल्याकडे त्याचा फार अभाव आहे.

आपलं पर्यावरण संस्था
मो. 9422267801
जेसीबीच्या साह्याने अशास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण करण्याचे प्रकार वाढत आहेत. झाड जमिनीपासून ओरबाडणे हे घातक आहे. यामुळे मूळे ताणली जातात. बरीच मूळे विचित्र पद्धतीने तुटतात. आपल्याकडे अजून अलगदपणे झाड उचलून काढण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. ती उपलब्ध झाल्यावरही तिचा पूर्णपणे इथल्या मातीच्या वेगवेगळ्या थरामुळे उपयोग होऊ शकतो का नाही याची शाश्वती नाही. कारण काही ठिकाणची माती भुसभुशीत, काही ठिकाणी मुरमाड (त्यातही अनेक प्रकार आहेत), काही ठिकाणी चिवट, तर काही ठिकाणी तीन-चार फुटावर दगडांच्या भेगांमध्ये मूळे गेलेली असतात. तेथे या यंत्रांचे पाते पण घुसू शकणार नाहीत.
वृक्ष पुनर्रोपणाची शास्त्रीय आणि योग्य पद्धत आपण जाणून घेऊया. आपण ज्या ठिकाणावरून तो वृक्ष पुनर्रोपणासाठी काढणार आहोत, त्या ठिकाणी प्रथम सात ते आठ फूट चारही बाजूने ड्रिल करून बघणे आवश्यक आहे. खाली मातीचा थर कुठपर्यंत खोल आहे, जर तीन-चार फुटांवरच दगड असल्याचे जाणवल्यास ते झाड पुनर्रोपण न केलेलच बरं. एवढे करूनही पुनर्रोपण केलेल्या त्या खोडाला (खोडच म्हणाव लागेल कारण विस्तार पुर्णतः छाटलेला असतो) टोकावर पालवी फुटते. ते जगले असे वाटते, ती पालवी त्या खोडाच्या सालीमध्ये जीवनसत्त्व असल्याकारणाने फुटलेली असते. कालांतराने झाडातले जीवनसत्व संपल्यानंतर पालवी गळून जाते. क्वचितच फुटलेली पालवी टिकल्यास ते फक्त खोडाच्या तोंडाशी व तीन-चार फूट तोंडापासून खालपर्यंत पानाचा घोस वाढलेला दिसतो. बराच काळ ते त्या मर्यादेत राहते. ते त्याचा पूर्वीचा विस्तार घेण्यास पूर्णपणे असमर्थ असते. कारण त्याच्या मुळांचा विस्तार पूर्वी एवढा नसल्याकारणाने त्याला पाहिजे त्या प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत. पुनर्रोपण केलेल्या झाडाकडे सातत्याने म्हणजे 365 दिवस काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. ती आपल्याकडे जेवढा पुर्नरोपणासाठी अट्टाहास केला जातो, तेवढे त्याच्या संवर्धनासाठी लक्ष दिले जात नाही. या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ, मनुष्यबळ व खर्च हा खुपच आहे.
पुनर्रोपण केलेल्या जागेवर तो वृक्ष वाळल्यावर ती जागा वाया जाते. त्याचे खोड तिथून काढायचे ठरल्यास परत खर्च असतो, म्हणून ते काढले जात नाही. आणि व्यापलेली जागा वाया जाते. पुनर्रोपण करण्यामध्ये वेळ व पैसा वाया घालवण्यापेक्षा त्याच पैशांमध्ये आणि वेळेमध्ये जास्तीत जास्त आठ-दहा फुटांची चांगली पर्यावरणपूरक रोपांची लागवड करता येईल. त्याचे संवर्धन केल्यास चांगल्या प्रकारे निसर्ग वाढीला नक्कीच हातभार लागेल.