इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
शिवार वाचन का करावे?
शिवार वाचन ही काळाची गरज आहे. शिवार वाचन म्हणजे नेमकं काय, आपण ज्या परिसरात, गावांमध्ये किंवा शहरात राहतो किंवा जातो, अशा ठिकाणचे शिवार वाचन कसं करायचं, ते का करायचं. शिवार वाचन म्हणजे त्या परिसरातील घर, इमारती, लोकं, झाड, इत्यादी गोष्टींची माहिती करून घेणे. आता आपण निसर्गाच्या बाबतीत शिवार वाचनाचा विचार करु. निसर्गाचं शिवार वाचन काय एवढं महत्त्वाचं का आहे हे आपण आज जाणून घेऊया.
निसर्ग शिवार वाचन म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरात नेमकं कुठल्या प्रकारची नैसर्गिक संपत्ती आहे. कुठल्या प्रकारची झाडे, झुडपे, वनस्पती आहेत. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आहेत. त्यामुळे त्या परिसरात कोणत्या प्रकारचे पक्षी, फुलपाखरू इतर घटक यांचं अस्तित्व आहे. शिवार वाचनाचा महत्वाचा दुवा म्हणजे त्या परिसरातील जुने जाणते, अभ्यासू व्यक्ती, यांच्याशी चर्चा करुन त्या परिसरातील नैसर्गिक घटकांच्या व वातावरणाच्या बाबतीत माहिती मिळण्यास मदत होते. उदा. अस्तित्वात असलेले झाडांची नावे कळतात, झाडांची साधारण वयोमर्यादा कळते. त्यामुळे त्या झाडाचे खोड, उंची, पर्णसंभाराचा विस्तार, कुठल्या वयात किती होतो याचा अभ्यास होतो.
वृक्षांवर पक्ष्यांची घरटी आहेत का? आहेत तर कुठल्या प्रकारच्या पक्ष्यांची आहेत. अजून कुठल्या प्रकारचे पक्षी येतात. त्या वृक्षाला फुलं असल्यावर कुठले पक्षी, मधमाशी, फुलपाखरू येतात. फळ असतांना कुठले पक्षी किंवा खार येतात. ते वृक्ष तेथे असल्यामुळे त्या परिसराला कुठल्या प्रकारचे फायदा किंवा महत्व आले आहे. हे शिवार वाचनामुळे आपल्याला लक्षात येतं. त्या भागातील प्रदेशनिष्ठ झाडांची, झुडपांची, वनस्पतींची ओळख होते. कोणत्या प्रकारचे घटक नामशेष झाले व होण्याच्या मार्गावर आहेत हे सुद्धा लक्षात येतं. त्यामुळे त्यांची संख्या वाढवण्यासाठी काम करता येते.
कुठल्या प्रजातीची झाडे, झुडप कुठे लावणे योग्य आहे हे लक्षात येते. निसर्गाचे शिवार वाचन करतांना, तेथील माती, वातावरण, भूजलस्तर याचा प्रथम विचार करावा. वृक्ष लागवड करतांना या अभ्यासचा खुप फायदा होतो. निसर्गाने काही गोष्टी आपल्याला आयत्या दिल्या आहेत. शिवार वाचनामुळे त्याच महत्व कळून येते. विकास (Development) करतांना असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्व कळाल्यामुळे समतोल विकास (Balance Development) करण्याची वृत्ती बळावेल. शिवार वाचन हा विषय शालेय शिक्षणात समाविष्ट करण्याची गरज आहे. यामुळे घडणारी पिढी ही खुप अभ्यासू व सजग होईल.