रोपांची निवड कशी करावी?
योग्य ठिकाणी, योग्य वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. बऱ्याच जणांना याचा अर्थ नक्की काय असा प्रश्न पडला असेल. वृक्षारोपण करताना आज-काल सर्वांना कळले की, देशी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. जेणेकरून इथल्या वातावरणाच्या दृष्टीने निसर्गाची साखळी राखण्यास म्हणजेच स्थानिक जैवविविधता पूर्ण वातावरण निर्मिती होण्यास मदत होईल. आज तेच आपण जाणून घेऊ..

आपलं पर्यावरण संस्था
मो. 9422267801
वृक्षारोपण करताना आपण ज्या भागात वृक्षारोपण करत आहोत, उदाहरणार्थ, महाराष्ट्र मध्ये विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. नाशिक, पुणे सारख्या ठिकाणी समतोल प्रमाणात पाऊस पडतो. दमट व कोरडे वातावरणही आहे. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अल्प असते. तसेच काही ठिकाणी दमट वातावरण, काही ठिकाणी कोरडे वातावरण असते. अशा वेळेस त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करताना तिथल्या वातावरणाच्या अनुसरून आपण वृक्षांची लागवड केली तर, ती नक्कीच फलदायी ठरेल.
काही देशी प्रजातींची झाडे सगळ्या वातावरणात वाढतात. पण काही देशी प्रजातींची झाडे ठराविक प्रदेशांमध्ये वाढतात. त्यामुळे अशा प्रदेशनिष्ठ वृक्षाची रोप नको त्या ठिकाणी लागवडीचा अट्टाहास करून आपण आपला वेळ व श्रम वाया घालवतो. त्याला यश मिळत नाही. म्हणून काही प्रमाणात आपल्याला नैराश्य येते. उदाहरणार्थ, बरीच मंडळी कडुनिंबाचे रोप हे कोकण पट्ट्यामध्ये म्हणजेच जास्त पावसाच्या ठिकाणी लागवड करतात. ते थोडे दिवस तग धरतात. कालांतराने अति पाऊस व तेथील दमट वातावरणामुळे ते सुकून जाते. याचा अर्थ कडुनिंब अति पावसाच्या व दमट हवामानाच्या ठिकाणी तग धरत नाही. ते उष्ण, कोरड्या हवामानाच्या ठिकाणी नैसर्गिकरित्या जोमाने वाढतात.
काही जण कदंब हे डोंगराळ व ऊष्ण प्रदेशात लावतात. तिथे ते तग धरत नाही. कदंबाला चांगली ओलावा टिकवून ठेवणारी माती लागते. जेथे ते चांगल्या प्रकारे वाढतात. काही ठिकाणी असं बघण्यात आलंय की, तिथे नैसर्गिकरित्या एखादी प्रजाती भरपूर प्रमाणात वाढलेली असते. उदा. परत आपण कडुनिंबाचं उदाहरण घेऊया. अशा वेळेस वृक्षारोपण करताना कडुनिंबाचे रोप लावले जातात. अशा वृक्षप्रेमींना मी सांगू इच्छितो की, आपण वृक्षारोपण करताना आधी शिवारफेरी करणं खूप गरजेचं आहे. आपल्या शिवारामध्ये कुठली स्थानिक झाडे नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात वाढली आहे, आपल्या शिवारामध्ये पूर्वी जी काही वृक्षराजी होती, आणि ती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, अशा वृक्षांची रोपे शोधून किंवा बी बियाणे गोळा करून त्याचं रोप तयार करायला हवे. ही रोपे आपल्या परिसरात लागवड करायला हवी. आपल्या परिसरातील पर्यावरणीय परिसंस्थांची साखळी अबाधित राखण्यास खूप महत्वाचं पाऊल समजले जाईल. वृक्षारोपण करताना त्या त्या प्रदेशातली जैवविविधता आपण राखु शकलो तरच त्या वृक्षारोपणला खरा अर्थ आहे. अन्यथा नुसताच उपचार होईल.
पुढच्या भागात वातावरण व मातीच्या पोत नुसार वृक्षांची ओळख करून घेऊ या…









