इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
मियावाकी पद्धत थांबवा
वृक्षलागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या मियावाकी पद्धतीबाबत आपण गेल्या भागात काही माहिती घेतली. आता आपण त्यापुढील काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणार आहोत. सारासार विचार करुनच आपण निश्चित करायला हवे की मियावाकी पद्धत थांबवायला हवी.

आपलं पर्यावरण संस्था
मो. 9422267801
मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यासाठी काही बाबी सर्रासपणे केल्या जात आहेत. खासकरुन चांगल्या पद्धतीच्या जमिनी या काही चौरस मीटर किंवा तीन फुटापर्यंत कोरल्या जातात. तिथे निर्माण झालेल्या जमिनीचा नैसर्गिक पोषक ढाचा म्हणजेच तेथील निर्माण झालेली जमीनीतिल जैवविविधा आपण पुर्णपणे धोक्यात आणतो आहोत. अशा चांगल्या जमिनीवर कमीतकमी दहा फुटांवर योग्य वृक्ष प्रजाती लागवड केल्यास आणि योग्य संवर्धन केल्यावर ते पण चांगल्या रितीने वाढतात.
प्रत्येक वृक्षांची एक पर्णसंभाराची रचना असते. त्यामुळे त्याचे एक वेगळे सौंदर्य आणि ओळख असते. पर्यावरणीय दृष्ट्या त्यांची अशी नैसर्गिक रचना व वाढ खुप आवश्यक असते. ती जैवविविधतेसाठी महत्वाची असते. आपल्या पारंपारिक जंगलातून मिळणारे फायदे मियावाकी पद्धतीने मिळत नाहीत. मियावाकी पद्धत अलीकडेच आपल्याकडे आली आहे. त्यामुळे या पध्दतीने लागवड केलेले वृक्ष 25 ते 30 वर्षात खुप फायदेशीर ठरेल, असे कुठलेही गणित जुळत नाही.
आजकाल दीड-दोन फुटांवर लागवड सुरू आहे. साधारण या पध्दतीने अर्धा एकर मध्ये, म्हणजेच 21780 चौरस मीटरमध्ये 10 हजार 890 रोपे लावायची. त्याला जंगल (Forest) म्हणायचं का? सुरवातीला एक-दोन वर्षे त्यांची वाढ बघायला छान वाटतं. नंतर दहा वर्षांत या ठिकाणी या झाडांची काय परिस्थिती होते त्याचाही विचार करायला हवा. या झाडांच्या पर्णसंभाराचा नीट विस्तार होत नाही. एकमेंकावर सावली पडल्यामुळे फुल व फळ धारणेवर विपरीत परिणाम होतो. म्हणजे पर्यावरणीय परिसंस्थेची साखळी खालवते. खोडांच्या वाढीमुळे जमिनीच्या वरचा भागात पण बराच क्लिष्ट (conjusted) होतो. काही वृक्ष मुळताच भरभर वाढणारी असतात. अशा पोषक ठिकाणी अजून भरभर वाढून दुसऱ्या प्रजातीवर सावली पडते. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. वन्यजीवांना राहण्यास अडचण होते. फार तर एक-दोन प्रकारचे वन्यजीव राहू शकतील.
आता आपण पारंपरिक पद्धतीने कमीत कमी 10×10 ते 12×12 या अंतराने वृक्षारोपण केल्यास 10 हजार 890 रोपांची लागवड होईल. या रोपांना 28 एकर जमीन लागेल. खर्च जवळपास सारखाच येईल. त्यांचे योग्य संवर्धन केल्यास, त्यांच्या बरोबर इतर जंगलातील घटक नैसर्गिकरित्या वाढतात. पंधरा ते वीस वर्षात चांगले जंगल निर्मितीला सुरुवात होते. पक्षी, फुलपाखरू, मधमाश्या, कीटक, सूक्ष्म जीवजंतू व वन्यजीवांचा चांगला आधिवास निर्माण होतो. प्रत्यक्ष अनुभवातून हे मी ठाम सांगू व दाखवु शकतो.
छान प्रेझेन्टेशन करून आणि मियावाकी जाहिराती केल्यामुळे लोकांपर्यंत पटकन पोहचले. कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या अगोदर परदेशी नाव असल्यावर आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो. त्याच्या मागे लागतो. आता सरकारी स्तरावर याचा अवलंब करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र निधीचीही तरतूद झाली आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे.
आगोदरच सरकारी योजनांमध्ये सर्रास परदेशी प्रजातीची झाडे लावली जात आहेत. त्यात निलगीरी, ग्लिरीसीडीया, आकॅशिया, रेनट्री सारखी वृक्ष प्रजाती लागवड करून वनीकरणासाठी वापरल्या गेल्या. त्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपल्याला माहितीच आहे. सरकारी धोरणांचे आपल्याकडे चांगले उदाहरण आहेच. याचे परिक्षण होणे गरजेचे आहे. मग आता आपणच ठरवा कशा पध्दतीने शाश्वत वृक्षारोपण करायचे आहे. वेळीच मियावाकीसारख्या पध्दती वापरणे थांबवा. येथे कोण चुकीचे, कोण बरोबर हे ठरवायचं नाही. काय योग्य आणि काय अयोग्य, हे समजून घेणे खुप गरजेचे आहे. त्यातच सर्वांचे हित आहे.