इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे
मियावाकी वृक्षारोपण शाप की वरदान?
मी गेल्या 24 वर्षांपासून वृक्षरोपण व संवर्धनाचे काम करत आहे. त्यामुळे अनेक जण मला मियावाकी वृक्षारोपण पद्धतीबाबत विचारत असतात. कधी प्रत्यक्ष, कधी फोनवरुन तर कधी मेसेजद्वारे. आजवरच्या अनुभवाद्वारेच मला या पद्धतीविषयी बरेच काही सांगायचे आहे. या आणि पुढच्या लेखात आपण त्याची सविस्तर माहिती घेऊ…

आपलं पर्यावरण संस्था
मो. 9422267801
आतापर्यंत मी एक लाखाहून अधिक रोप लावले आणि त्यांचे संवर्धन केले आहे. मला वाटले म्हणून मी लगेच मियावाकी पध्दतीला विरोध करत नाहीय. मी गेल्या चार-पाच वर्षांपासून या गोष्टीचा अभ्यास करत आहे. याचे फायदे व धोके याचा विचार करुनच, आता माझे ठाम मत मी येथे मांडत आहे.
एकीकडे देशी वृक्षांचे महत्व समजता समजता, बराच काळ निघून गेला. आता कुठे त्याचे महत्व लोकांना पटले आहे. तर मियावाकी सारख्या विदेशी पध्दतीने वृक्ष लागवडीचे फॅड, कुठलाही अभ्यास न करता आणि शाश्वतपणा लक्षात न घेता फोफावत आहे. आधी आपण चांगल्या जागा, भरभर वाढणाऱ्या विदेशी वृक्ष प्रजाती लावुन खराब केल्या. आताशी कुठे आपल्याला देशी झाडांचे महत्व कळायला लागले. तसेच कुठेतरी ही देशी प्रजाती वृक्षांची रोपे मिळायला लागली. अशातच आपण मियावाकी फॉरेस्ट सारख्या विदेशी पध्दतीचा वापर करुन आपण त्या रोपांचाच नाश करत आहोत.
मियावाकी फॉरेस्ट ही पद्धत नेमकी काय आहे ते सर्वप्रथम समजून घेऊ. मियावाकी फॉरेस्ट म्हणजे सोप्या भाषेत, उदा:- 40 फुट × 40 फुट = 1600 स्क्वेअर फुटात, 800 नग. म्हणजेच दोन दोन फुटांवर वृक्ष व झुडपांची लागवड करून ती वाढवणे. ज्यांनी ही पद्धत शोधून काढली ते डाॅ. आकिरा मियावाकी. ते जपानचे वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. ही पद्धत शोधून काढण्या मागचं कारण म्हणजे त्यांना एक जागा अशी सापडली की किती तिथे कुठल्याही प्रकारची रोपे त्या जमिनीवर उगवत नव्हते. म्हणजे ती जमीन नापिक होती. प्रयोग म्हणून अशा ठिकाणी वृक्ष प्रजातींची, झुडुप प्रजातींबरोबर सांगड घालणे, 3 फुटाच्या अंतरावर लागवड करणे, कमी पाण्याचा वापर करून हरीत पट्टा तयार करणे हे त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी ही पध्दत कशी वापरली हे आपण समजावून घेऊ.
ज्या मृत जमिनीवर हे करायचं त्या ठिकाणचं साधारणतः तीन फुटापर्यंत जमिनीचा थर कोरून काढायचा. मग त्या ठिकाणी पोषक जमीन तयार करण्यासाठी नव्याने वेगवेगळ्या पद्धतीची खते टाकायची. शेणखत, गांडुळ खत, कंपोस्ट खत, तांदुळाची साळ, मशरूम खत, कोकोपीट, पालापाचोळा आदी. अशा पद्धतीने त्या कोरलेल्या जमिनीमध्ये ह्या उपलब्ध खतांच्या दोन फुटापर्यंत भरणा करायचा. वरचा थर साधारण एक फूट ते नऊ इंच हा मातीने भरायचा. त्याच्यामध्ये आपल्याला हवे ते वृक्ष प्रजाती योग्य रितीने लागवड करायची आणि हिरवा पट्टा तयार होईल.
वेगवेगळ्या ओलावा धरुन ठेवणाऱ्या खतांच्या थरामुळे त्या ठिकाणी एकदा व्यवस्थित पाणी दिले तर तिथे भरपूर दिवस ओलावा टिकून राहतो. अशा तयार केलेल्या पोषक माती मध्ये ठराविक वृक्ष प्रजाती काही काळ भरभर, सरळ वाढतात. अशी ही डाॅ अकीरा मियावाकी यांची मृत मातीला अनुसरून पद्धत. पण आपल्याकडे ही पद्धत वापरणारे याचा मूळ उद्देशच विसरून गेलेत. सरसकट चांगल्या प्रतीच्या मातीमध्ये, डोंगर, दऱ्या असे कुठेही या पद्धतीचा अवलंब सुरू झाला आहे. ही पध्दतीचा अवलंब करताना झाड दाटीने लावल्यामुळे एकमेकांशी स्पर्धा करतात. म्हणून पटकन आणि सरळ वाढतात असा तर्क लावून मोकळे होतात. याबद्दल मी सांगू इच्छितो की, एक रोप लावण्यापुरता खोल खड्डा घेणे आणि त्या पध्दतीने खत, माती टाकली. रोप लावले तर अश्या पोषक गोष्टीमुळे ते एकच रोप सुद्धा पटकन आणि काही उंची पर्यंत सरळ वाढते.
पुढच्या भागात आपण उर्वरीत माहिती जाणून घेऊ
क्रमशः