नक्की कोणते झाड लावावे?
वृक्षारोपण करायचे आहे? मग, वृक्षरोपणाविषयी समजवून घेणे गरजेचे आहे. वृक्षारोपण करताना प्रथम विचार करण्याची गरज आहे, आपण केलेल्या वृक्षरोपणाचे कसे संरक्षण करु, कसे त्याचे संवर्धन करु, मगच वृक्षरोपणाचा विचार करावा. आता वेळ आली आहे वृक्षारोपण म्हणजे काय हे नीट समजून घेण्याची….!
वृक्षारोपण पावसाळ्यात झालं पाहिजे, असा काही नियम नाही. वर्षभरात तुम्ही कुठल्याही दिवशी वृक्षरोपण करू शकतात. फक्त त्यांची सांभाळायची जबाबदारी घेणे गरजेचे. आहे. मित्रांनो, वृक्षलागवडीचा उद्देश हा पर्यावरण संवर्धनाकरिता योग्यच आहे, मात्र आपण हे करताना काही खूप मोठ्या चुका करत आलो आहोत. या चुका अजाणतेपणाने घडणाऱ्या जरी असल्या तरी त्यामुळे आपल्या उद्देशाला हरताळ फासला जाऊ शकतो. म्हणून आपण वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे.
अगोदर आपण वृक्षारोपण करताना पटकन वाढणारी काही रेन-ट्री, गुलमोहर, पेल्ट्राफॉर्म, अकेशिया, स्पॅतोडिया, गिरीपुष्प, निलगीरी, सुबाबुळ यासारख्या विदेशी प्रजातींची झाडे लावून, ती वाढवून केवळ डोळ्यांना हरित दिसेल याची तजवीज करुन ठेवलेली आहे. या विदेशी झाडांमुळे आपल्या जैवविविधतेचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आपल्या लक्षात आले आहे की, देशी झाडे लावली पाहिजेत. आता अनेक जण नर्सरीमध्ये जाऊन वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब या प्रजातींची मागणी करताना दिसतो. आपण जेव्हा जैवविविधतेचा विचार करतो तेव्हा नुसतं वड, पिंपळ, उंबर, लावून चालणार नाही, तर याव्यतिरिक्तही अजून जैवविविधता सक्षम राखण्यासाठी देशी प्रजाती अस्तित्वात असणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण आपला वृक्ष अभ्यास वाढविणे आणि समजावून घेणे आवश्यक आहे.
वृक्षारोपणासाठी ज्या जागेची निवड केली त्या परिसराचे आपण थोडक्यात वृक्षारोपणाच्यादृष्टीने वाचन करणे गरजेचे आहे. त्याला आपण शिवार वाचन असे म्हणूया. अशा ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार योग्य अशी प्रदेशनिष्ठ झाडांची निवड करणे अपेक्षित आहे. कोणाला रस्ता लगत, इमारतीच्या आवारात, कोणाला उद्यानासाठी सोडलेल्या जागेत, कोणाला डोंगरावर झाडे लावायची आहेत तर कोणाला गावाजवळ उपलब्धतेनुसार एक-दोन एकरात वृक्षारोपण करायचं आहे. डोळ्याला पटकन दिसतील, अशी नऊ ते दहा फुटांची वाढलेली सहज उपलब्ध असलेल्या त्याच त्याच प्रजातींची रोपे आणून लागवड करण्यामध्ये सुद्धा अनेक जण समाधानी आहेत. अशा मित्रांना वृक्षारोपण हा सोपस्कार नाहीये एक जबाबदारीने पार पाडण्याची प्रक्रिया आहे हे पक्कं लक्षात घेण्याची गरज आहे. योग्य ठिकाणी, योग्य वृक्ष प्रजातीची लागवड ही काळाची गरज आहे.
माझ्या पर्यावरण प्रिय मित्रांना मी एवढेच सांगू इच्छितो की, (पर्यावरणपूरक वृक्ष लागवडीच्या मागील २४ वर्षांच्या अनुभवातून) आपल्या अवती भवती जी पूर्वी पर्यावरणपूरक देशी झाडे होती त्यातील काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आणि त्या झाडांच्या प्रजाती आपल्या परिसरातील निसर्गाची साखळी अबाधित राखण्यासाठी खुप उपयुक्त आहेत, अशा वृक्षांची रोपे मिळवून किंवा तयार करून आपल्या परिसरात लावण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण हेच खरं वृक्षारोपणाचे अभ्यासपूर्ण तत्व आहे. वृक्षरोपण म्हणजे डोळ्याला पटकन हिरवळ दिसण्यासाठी नाही तर ती एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. जैवविविधतापूर्ण वातावरण निर्मितीसाठी, जबाबदारीने पुढे त्याच्या वाढीसाठी, संयमाने स्विकारण्याचे व्रत आहे.
चला तर मग वृक्षारोपण करताना विविध प्रदेशनिष्ठ व देशी झाडांची निवड करूया आणि खऱ्या अर्थाने पर्यावरण अन् जैवविविधतेची साखळी टिकवून ठेवण्यास हातभार लावूया…! या संपूर्ण लेखमालेत आपण अशाच बारीक सारीक बाबी, समज-गैरसमज आणि आदींचा धांडोळा घेणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. कोपर्यंत नमस्कार….