दादीसा सुरेखा सिक्री
कलाकाराचे मोठेपण त्याने केलेली भूमिका किती मोठी आहे – त्याला संपूर्ण चित्रपटात किती फुटेज मिळाले आहे यावर ठरत नाही. जे कलावंत खरोखरच मोठे प्रतिभावंत असतात ते एखाद्या लहानशा भूमिकेत सुद्धा आपल्या अभिनयाची चमक अशी काही दाखवतात की सगळ्या चित्रपटातली ती भूमिका विसरु म्हटले तरी विसरणे शक्य नसते. तुम्ही सगळ्यांनी आमीरखानचा सरफरोश बघितला असेल. सुलतान हे त्यातल्या अनेक दहशतवादी गुंडांमधले एक पात्र. पोलिस त्याच्या घरावर रेड घालतात त्या एका सीनमध्ये सुलतानची आई ह्या भूमिकेत जी चमक आणि आपल्या अभिनयाची जी उंची सुरेख सिक्री यांनी दाखवली तिला तोंड नाही. त्या भूमिकेत त्यांना फारसे संवाद देखील नाहीत. पण एका हाताबाहेर गेलेल्या आणि आपल्याला मानहानीकारक वाटणाऱ्या धंद्यात आपला लेक गेल्याची जी खंत.. आणि त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे अशी जी भावना त्या असहाय्य आईच्या मनात असते ती आपल्या केवळ नजरेतून आणि चेहऱ्यावरच्या हावभावातून इतक्या प्रभावीपणे त्यांनी व्यक्त केली की सगळ्या चित्रपट संपला तरी सुलतानची आई विसरता येणे शक्य होत नाही. आपल्या अभिनय कौशल्यामुळे छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही पडद्यांवर आपल्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्या ७५ वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. गेल्या वर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोकही झाला होता.
दिल्लीमध्ये जन्मलेल्या सुरेखा पत्रकार किंवा लेखिका बनू इच्छित होत्या. परंतु, नियतीने मात्र त्यांच्यासाठी वेगळेच भविष्य लिहिलेले होते. त्या तेव्हा अलीगढ मुस्लिम विद्यापीठात शिकत होत्या. एकेदिवशी त्यांच्या कॉलेजमध्ये अब्राहम अल्काझी आले होते. त्यांनी सादर केलेलं नाटक पाहून सुरेखा खूप प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश घेण्याचं ठरवलं. त्या एनएसडीचा फॉर्मदेखील घेऊन आल्या होत्या. परंतु, अनेक दिवस तो फॉर्म त्या भरू शकल्या नव्हत्या. सुरेखा यांच्या आईने त्यांना फॉर्म भरण्याचा सल्ला दिला. आईचं म्हणणं मान्य करत त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना तिथे प्रवेश मिळाला. आणि त्यांच्या आयुष्याला पूर्णतः वेगळे वळण मिळाले.
१९७१ मध्ये राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीची सात-आठ वर्षे सुरेखा सिक्री यांनी एनएसडी रेपेर्टरी कंपनीत फक्त रंगभूमीसाठीच काम केले.त्यानंतर सुरेखा यांनी अनेक वर्ष नाटकांत काम केलं. छोट्या पडद्यावर त्यांनी ‘बालिका वधु’, ‘बनेगी अपनी बात’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘एक था राजा एक थी रानी’, ‘केसर’, ‘कभी कभी’ आणि ‘जस्ट मोहब्बत’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. परंतु, त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘बालिका वधू’ मालिकेतील दादीसा या पात्रामुळे. सुरेखा यांनी चित्रपटांमध्येही नाव कमावलं. ‘नसीब’, ‘सरदारी बेगम’, ‘दिल्लगी’, ‘नजर’, ‘जुबेदा’, ‘रेन कोट’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘हमको दीवाना कर गए’, आणि ‘घोस्ट स्टोरीज’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. ‘बधाई हो’ मधील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.
सुरेखा सिक्री यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘बालिका वधु’ सारख्या मालिकेत त्यांची भूमिका आजही लक्षात राहते. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. आयुषमान खुराना प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातील सुरेखा सिक्री यांची भूमिका विशेष लक्षात राहते. जवळपास ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत सुरेखा यांनी ‘किस्सा कुर्सी का’, ‘तमस’, ‘सलीम लंगड़े पे मत रो’, ‘मम्मो’, ‘नसीम’, ‘सरदारी बेगम’, ‘सरफरोश’, ‘दिल्लगी’, ‘हरी भरी’, ‘जुबैदा’, ‘काली सलवार’, ‘रघु रोमियो’, ‘रेनकोट’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘बधाई हो’, ‘शीर कोरमा’ आणि ‘घोस्ट स्टोरीज’ यांसारख्या अनेक नावाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त सुरेखा यांनी ‘बालिका वधू’, ‘एक था राजा एक थी रानी’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘सात फेरे’, ‘बनेगी अपना बात’, ‘कसर’, ‘कहना है कुछ मुझको’, ‘जस्ट मोहब्बत’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.
रंगभूमीवरच्या योगदानाबद्दल त्यांना पुढे १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राजो या ‘तमस’मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘मम्मो’ या सिनेमातील फैय्याजीच्याच भूमिकेसाठी त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. टीव्ही मालिकाविश्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या टेली अॅवॉर्डनेही सुरेखा सिक्री यांचा गौरव करण्यात आला होता. २००८ पासून ते २०१६ पर्यंत अशी तब्बल नऊ वर्षे त्यांनी बालिका बधू मधली ‘दादीसा’ देशभर पोहोचली. ह्या दादीसा प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहतील हे नक्की.