भजन गायक पद्मश्री मुन्ना मास्टर
जयपूर जवळच्या बगरू ह्या गावात राहणाऱ्या एकसष्ट वर्षांच्या रमझानखान यांना सारेजण मुन्ना मास्टर म्हणून ओळखतात. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – [email protected]
मागल्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विभागात संस्कृत शिकविण्यासाठी डॉ. फिरोजखान नावाच्या एका मुस्लीम धर्मीय प्राध्यापकांची नियुक्ती झाली होती आणि त्यावरून त्या विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलनही झाले होते. पुढे संस्कृत विभागाऐवजी कला शाखेच्या संस्कृत विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर ते आंदोलन मागे घेतले गेले. मात्र भारत सरकारने डॉ. फिरोजखान यांचे वडील रमझानखान यांना मागच्या वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. विद्यापीठातल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तर हा पुरस्कार अधिकच महत्वाचा ठरतो आहे. काहीही न बोलता केंद्राने ह्या विषयाबद्दलचे आपले मत काय आहे ते सांगून टाकले होते.
जयपूर जवळच्या बगरू ह्या गावात राहणाऱ्या एकसष्ट वर्षांच्या रमझानखान यांना सारेजण मुन्ना मास्टर म्हणून ओळखतात. आपल्या गावातल्या एका ज्योतिषाने सांगितले म्हणून रमझानखान यांनी मुन्ना मास्टर असे टोपणनाव धारण केले आणि सारा राजस्थान आज त्यांना त्याच नावाने ओळखतो आहे. कृष्णभक्तीची भजने सादर करणारा एक भजन गायक म्हणून त्यांना साऱ्या राजस्थानात ओळखले जाते आणि त्यांचा गौरव त्यांच्या भजन गायनासाठीच करण्यात आलेला आहे. मुन्ना मास्टर त्यांचे वडील गफूरखान हे देखील भजन गायक होते.
वयाच्या सातव्या वर्षी मुन्ना मास्तरांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतरच्या काळात मुन्ना अनेक साधू-संतांच्या सहवासात वाढले आणि त्याच काळात त्यांनी भजनगायनाची वडिलांची परंपरा आत्मसात केली. सहाजिकच त्यांच्या समाजातल्या कडव्या लोकांचा विरोध देखील त्यांना सहन करावा लागला. काहीवेळा तर त्यांना मारहाणीच्या प्रसंगांना देखील सामोरे जावे होते.
कृष्णचरित्रावरच्या भजनांप्रमाणेच मुन्ना मास्टर यांनी संस्कृतवर देखील प्रभुत्व मिळवलेले आहे. संस्कृतमध्ये शास्त्रीची परीक्षा देखील ते उत्तीर्ण झालेले आहेत. मास्टरांनी आपल्या मुलांना देखील संस्कृत शिकवलेले आहे आणि त्यामुळेच त्यांचा मुलगा असणाऱ्या फिरोजखानने संस्कृतमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. इतकेच नव्हे तर वकील, शकील, फिरोज आणि वारिस ह्या आपल्या चारही मुलांना त्यांनी संस्कृत शिकवलेले आहे. बगरू मधल्या संस्कृतशाळेत त्यांनी आपल्या मुलांची शिक्षणे केली आहेत. त्यांच्या सर्व मुलांना हनुमान चालीसा मुखोद्गत आहे.









