जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रम विभागाच्या उपमहासंचालकपदावर काम करीत असलेल्या डॉ. सौम्या यांची मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यात मुख्य शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोरोनाच्या या संकटात त्यांची भूमिका आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्याच कारकीर्दीवर टाकलेला हा फोकस…
कोविड१९ च्या संदर्भात जगभरात केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजनांना जागतिक आरोग्य संघटनेकडून मार्गदर्शन मिळते आहे. त्यामुळेच आजच्या ह्या वैश्विक संकटाच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेवर चर्चा व्हायला लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या कार्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. आत्ता आत्तापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रम विभागाच्या उपमहासंचालकपदावर काम करीत असलेल्या डॉ. सौम्या यांची मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यात मुख्य शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये जाण्याअगोदर त्या इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मध्ये काम करीत होत्या. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये इतक्या उच्च पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत.
जागतिक कीर्तीच्या बालरोगतज्ज्ञ असलेल्या बासष्ठ वर्षांच्या डॉ. स्वामिनाथन गेल्या तीन दशकांहून अधिक काळ क्षय आणि एचआयव्हीवर संशोधन कार्यक्रम राबवीत आहेत. जागतिक कीर्तीचे कृषीशास्त्रज्ञ आणि ज्यांना भारतातल्या हरित क्रांतीचे जनक असणाऱ्या डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांच्या त्या कन्या आहेत. वैज्ञानिक कार्याचा वारसा त्यांना वडिलांकडूनच लाभलेला आहे.
पुण्याच्या आर्मफोर्सेस मेडिकल कॉलेजातून एमबीबीएस झाल्यावर त्यांनी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लॉस एंजलीसमधल्या केक स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये बाल रुग्णालयातून त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातले डॉक्टरेट नंतरचे अध्ययन पूर्ण केले . चेन्नईच्या राष्ट्रीय टीबी संशोधन संस्थेत त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले आहे. देशातल्या क्षयरोग निर्मुलनाच्या मोहिमेत विशेषतः समाजातल्या गरीब थरातल्या लोकांमध्ये क्षयरोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरलेले आहे.
काही काळ भारत सरकारच्या आरोग्य खात्याच्या सचिवपदाची धुरादेखील त्यांनी सांभाळली आहे. त्याचप्रमाणे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. सरोगसीच्या संदर्भातील कायद्याच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यासाठी नेमल्या गेलेल्या तज्ञ समितीमध्ये त्यांनी काम केलेले आहे.
आजवरच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांना जागतिक स्तरावरचे अनेक महत्वाचे मानसन्मान मिळालेले आहेत. एक नामांकित डॉक्टर असलेल्या सौम्या उत्तम व्हॉयोलीन वाजवतात. त्यांचे कर्नाटक शैलीतल्या व्हॉयोलीन वादनाचे अनेक कार्यक्रम आकाशवाणी वरून झालेले आहेत. त्यांना संगीताप्रमाणेच नाटकांची देखील आवड आहे.
जागतिक आरोग्य संघटनेशी त्यांचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. जवळपास गेली दहा वर्षे त्या युनिसेफ आणि युएनडीपी तसेच जागतिक बँक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या स्तरावर काम करीत आहेत. विशेषतः उष्ण हवामानाच्या प्रदेशात क्षयरोगाच्या आणि एचआयव्हीचा प्रतिबंध व्हावा यासाठी त्यांचे काम महत्वाचे ठरलेले आहे. प्रयोगशाळेत होणारे संशोधन प्रत्यक्षात रूग्णांसाठी उपयोगी ठरावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केलेले आहेत. कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात अनेक ठिकाणी सुरु आहेत. त्या प्रयत्नात समन्वय आणि सहकार्य असावे ह्यासाठी काम करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या गटाच्या डॉ.सौम्या प्रमुख आहेत.
सुरुवातीला डॉ. स्वामीनाथन हे इंग्लंडमधल्या लेसेस्टर विद्यापीठात बालरोग आणि श्वसन रोग विभागात संशोधन फेलो म्हणून काम करीत होत्या. त्यानंतर त्यांनी न्यू जर्सीच्या टुफट्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन मध्ये वरिष्ठ आरोग्य अधिकारी तसेच असोसिएट क्लिनिकल प्रोफेसर म्हणून म्हणून काम केले. १९९२ मध्ये भारत सरकारच्या क्षयरोगात राष्ट्रीय संशोधन संस्थेसाठी क्षयरोग संशोधन केंद्रात रुजू झाल्या. नंतर त्या क्षय रोगाच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेची संचालक झाल्या. त्यानंतर डॉ. स्वामिनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनेव्हा मधील उष्णकटिबंधीय रोगांचे संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून देखील काम केले.
२०१३ मध्ये त्या चेन्नईतल्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेच्या संचालक होत्या. त्यानंतर ऑगस्ट जवळपास दोन वर्षे त्यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक आणि भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव होत्या. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत क्षयरोग (टीबी), साथीचे रोग ह्या विषयांमध्ये डॉ. स्वामिनाथन यांनी लक्षणीय काम केलेले आहे.
चेन्नईच्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेमध्ये असताना, स्वामीनाथन यांनी टीबी आणि टीबी / एचआयव्हीच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारा वैज्ञानिकांचा एक विशेष गट सुरू केला होता ज्यात विविध शाखांमधल्या तज्ञ वैज्ञानिकांचा समावेश केलेला होता . ह्या वर्षीच इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या जी-७ च्या राष्ट्रप्रमुखांना सल्ला देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका महत्वाच्या गटामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढचे ६ ते १८ महिने सर्वात कठीण असतील असे त्यांचे म्हणणे आहे. ह्या काळात कोरोनाच्या विषाणूच्या स्वरुपात बदल होण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या काळात कोरोनाच्या ज्या लाटा येतील त्यात विषाणूमध्ये बदल कसे असतील आणि त्याला सामोरे जाण्यात आपण कितपत यशस्वी होऊ यावर पुढचा काळ कसं असेल ते ठरेल. २०२१ च्या अखेरीस ३०% लोकांचे लसीकरण झालेले असेल . त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूची संख्या कमी असेल. तथापि, सामुहिक प्रतिकारशक्ती गाठण्यासाठी, लसीकरणानंतर किती लोक कोरोनाचा मुकाबला करण्यास सक्षम असतील याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
भारताने जगातल्या इतर अनेक देशांपेक्षा ह्या महामारीच्या पहिल्या लाटेचे संकट चांगल्या पद्धतीने पेलले होते पण दुसऱ्या लाटेने आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी केलेली आहेत. त्यांना सामोरे जातांना आपल्याला आपल्या वैद्यकीय सुविधांकडे असे सांगतांनाच रॅपिड अँन्टीबॉडी टेस्टिंग सारख्या पद्धतीची विश्वासार्हता अजून सिध्द झालेली नाही हे त्या सांगतात. कोरोना व्हायरस बद्दल अजून आपल्याला फारशी प्रमाणित माहिती उपलब्ध झालेली नाही म्हणून जगभरात विविध ठिकाणी होत असलेल्या प्रयोगांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे. आणि हीच जबाबदारी त्यांच्याकडे आहे हे महत्वाचे आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!