प्रा. केशवराव शिंपी हे आज वयाची पंचाहत्तरी गाठत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय मौल्यवान आहे. तसेच ते व्यक्ती म्हणूनही तितकेच दिलदार आणि ग्रेट आहेत.
काही जणांना सतत काम करीत राहण्याची सवय असते. त्यांना कधी कामाचा कंटाळा येत नाही..कधी ‘ क्षणभर विश्रांती ’ म्हणून ही माणसे कधी काम थांबवून आळसात वेळ घालवत नाहीत… अशी माणसे कधी कामाची टाळाटाळ करीत नाहीत.. कधी आजचे काम उद्यावर ढकलत नाहीत.. एखादे काम आपल्या मनासारखे जमले नाही किंवा त्यात आपल्याला अपेक्षित परिणाम मिळाला नाही तरी अशी माणसे निराश वगैरे होत नाहीत. स्थितप्रज्ञपणाने ते काम पुन्हा करायला सुरुवात करतात.
माझ्या परिचयाच्या अशा कार्यमग्न माणसांमध्ये प्रा. केशवराव शिंपी यांचा क्रम खूप वरचा आहे. त्यांची माझी भेट साधारण १९७० च्या आसपास झाली असेल. त्या काळापासून थेट २०१६ पर्यंत गेली जवळपास पंचेचाळीस वर्षे मी त्यांना सतत कार्यमग्न अवस्थेत पाहिलेले आहे. सुरुवातीच्या काळात गरज म्हणून कामाला लागलेल्या प्रा.शिंपींना आज काम करीत राहण्याची इतकी सवय झालेली आहे की आता केवळ सवय – एखादी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून ते आज सत्तरीतही काम करीत आहेत … तेही सुरुवातीच्याच जोमाने आणि तितक्याच उत्साहाने .. तितकेच मनापासून.
सिन्नरजवळच्या मनेगाव सारख्या , त्याकाळच्या खेड्यातून उच्च शिक्षणासाठी आलेल्या प्रा. शिंपींना महाविद्यालयात आल्यावर प्रा. डॉ. गोसावी सरांसारखा गुरु मिळाला. त्या परीसस्पर्शाने त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणाने बदलली. सुरुवातीच्या काळात त्यांनी बीवायके कॉलेजच्या कार्यालयात काम केले. पण प्राध्यापक झाल्यावर त्यांना खरी ओळख सापडली. त्याच काळात कधीतरी त्यांना बँकेत अधिकारी म्हणून जाण्याची संधीही मिळाली होती. पण ते तिथे गेले नाहीत.
बँक अधिकारी म्हणूनही ते यशस्वी झाले असते यात मला शंकाच नाही. कोणतेही काम अतिशय पद्धतशीरपणाने करण्याची त्यांची सवय तिथेही त्यांना उपयोगी ठरली असती. पण प्राध्यापकीत शिंपीसर ख-या अर्थाने रमले. नवेनवे विषय अभ्यासावेत , त्यावरची पुस्तके अभ्यासावीत, त्याविषयांवरचे अद्ययावत ज्ञान मिळवावे आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना द्यावे ह्या कामात त्यांना स्वतःची खरी ओळख सापडली. आणि एक उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला.
विद्यार्थ्यांना वर्गात शिकवतांनाच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यात ते नेहमीच पुढाकार घेत असत. विशेषतः ग्रामीण भागातून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे सहाय्य आणि मार्गदर्शन नेहमीच मिळत आलेले आहे. याबाबतीत आपल्याला बीवायकेत डॉ.गोसावीसरांनी केलेले सहाय्य आणि मार्गदर्शन ते विसरलेले नाहीत तोच कित्ता गिरवत आजही ते स्वतः त्याच मार्गावर चालण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
प्रा. शिंपी म्हणजे एक अत्यंत बिनचूक काम हे एक कायमचे समीकरण आहे. मी त्यांना नेहमी एक परफेक्शनिस्ट मानत आलेलो आहे. एखादे साधे लिखाण असले – मग ते पत्र असो की एखादी साधी सूचना असो – तरी त्यासाठी ते मेहनत घेतल्याशिवाय राहत नाहीत. त्यात शब्द कोणते असावेत, त्यांचा वापर कसा केला जावा .. येथपासून त्याच्या प्रत्यक्ष प्रेझेन्टेशनपर्यंत प्रत्येक बाबतीत ते काटेकोर असतात. म्हणूनच आजही त्यांच्या खिशाला तीनचार रंगांचे पेन्स अडकवलेले असतात आणि त्यांचा वापर कधी आणि कसा करावा हे त्यांनी नक्की केलेले असते.
उगाचच कोणतीही गोष्ट करण्याची त्यांची वृत्ती नाही की त्यांना ती सवयही नाही. त्यामुळे योजना करून आणि उत्तम रचनात्मक विचार करून मगच ते कोणतेही काम करतात हे सहज जाणवत असते. आपल्यासारखेच काम दुस-यांनीसुद्धा करावे अशी त्यांनी अपेक्षा असते पण जर त्या दुस-याकडून तितके जमले नाही तर नाराज न होता त्याला शांतपणाने समजाऊन सांगण्याचा आणि त्यात गरज असेल तर त्याला स्वतः मदतीचा हात द्यायला ते कशी मागे राहत नाहीत. त्यामुळेच केवळ हाताखालच्या लोकांना काम सांगितलेय आणि त्यांच्यावर काम ढकलून दिलेय आणि स्वतः प्रा.शिंपीसर शांत बसलेले आहेत असे दृश्य सहसा दिसत नाही.
पुणे विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर प्रा. शिंपी यांनी काम केलेले आहे. तीसएक वर्षांपूर्वी बीवायकेत डॉ.गोसावीसरांनी अतिशय दूरदर्शीपणाने सुरु केलेला वाणिज्य शाखेचा पुनर्रचित अभ्यासक्रम यशस्वी झाला असेल तर त्याचे श्रेय मुख्यतः प्रा.शिंपी यांच्या योजकतेला द्यायला हवे. पुनर्रचित अभ्यासक्रमातल्या विविध विषयांची रचना, त्यांच्या गुणांचे आणि मूल्यमापनाचे निकष, त्यासाठी करावयाच्या प्रश्नपेढ्या , त्यातली प्रात्यक्षिके ह्या ब-याच किचकट वाटणा-या गोष्टी प्रा. शिंपीसरांमुळे अगदी सुकर झाल्या आणि त्यामुळेच अनेकांना त्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे काम करणे शक्य झाले.
अगदी पुणे विद्यापीठात जर एखाद्या विषयाची प्रश्नपेढी सापडू शकली नाही तर ती मागण्यासाठी थेट विद्यापीठातून केवळ प्रा.शिंपीसरांना साकडे घातले जाते याचा अनुभव अनेकदा आलेला आहे. आणि कोणताही किंतु मनात न ठेवता तेदेखील आपल्याकडची माहिती क्षणार्धात उपलब्ध करून देतात हा अनुभवसुद्धा काही नवा नाही. विद्यार्थ्यांना मात्र ह्या अभ्यासक्रमामुळे त्यांच्या भवितव्याच्या अनेक मोठ्या संधी खुल्या झाल्या. आजही अनेक विद्यार्थी नव्यानव्या क्षेत्रात महत्वाची कामे करून पुनर्रचित अभ्यासक्रमाचे यश सिध्द करीत आहेत. यासगळ्याच्या मागे प्रा.शिंपीसरांच्या कामाचे योगदान आहे हे विसरता येणार नाही.
आज वयाची पंचाहत्तरी गाठणारे प्रा.केशवराव शिंपी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अतिशय समाधानी आहेत. पत्नी,भावंडे, मुले, नातवंडे ह्यांचे खूप मोठे गणगोत त्यांच्या भोवती आहे. त्यांच्या समाजाच्या कामातही त्यांच्या शब्दाला मोठे वजन आहे. वयाच्या ह्या टप्प्यावरसुद्धा ते आजही कार्यरत आहेत. पूर्वीसारखेच आजही ते सकाळी कॉलेजला येतात.. दिवसभर तिथे प्रामाणिकपणाने विद्येची सेवा करतात. तीच त्यांची कर्मभूमी आहे आणि तीच त्यांची खरी ओळखही आहे. त्यांनी असेच काम करीत रहावे अशी त्यांचा मित्र व सहकारी म्हणून शुभेच्छा!
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!