नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केरळची सूत्रे पुन्हा एकदा पी. विजयन ह्यांच्याकडे आली आहेत. आलटून पालटून सत्ता परिवर्तन होणाऱ्या केरळमध्ये सतत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा एक विक्रमच त्यांनी केलेल्या आहे. पिनराई विजयन हे केरळमधले एक लोकप्रिय आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. पंचाहत्तर वर्षांचे विजयन हे एक उत्तम प्रशासक आणि कर्तव्यकठोर नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच सतत दुसऱ्या वेळी शासनाची सूत्रे त्यांच्या हाती येत आहेत असे म्हणावेच लागेल.
ते भागातल्या एका अतिशय गरीब कुटुंबातले. त्यांचे वडील शेतमजूर म्हणून ताडफळे काढण्याचे काम करीत असत. त्यामुळे त्यांचे लहानपण खूप कष्टात गेले. सहाजिकच शिक्षणासाठी त्यांना झगडावे लागले. शालेय शिक्षण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या विजयन यांना स्वतःला काही काळ हातमागावर मजुरी करावी लागलेली होती. थाल्लासेरीच्या ब्रेन्नन कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. विद्यार्थी असल्यापासूनच राजकारणाकडे त्यांचा ओढा होता त्यामुळे विद्यार्थी चळवळीकडे ते ओढले जाणे क्रमप्राप्तच होते. त्याच काळात त्यांचा संपर्क डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांशी आला. केरळ स्टुडंट्स फेडरेशनचे सरचिटणीस आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. केरळ सोशालिस्ट युथ फेडरेशनच्या अध्यक्षपदावरसुद्धा त्यांनी काम केले. ह्याच काळात डाव्या विचारांमध्ये अतिरेकी नक्षलवाद वाढत होता. पण केरळमध्ये ज्या नेत्यांमुळे डाव्या विचारांच्या मुख्य प्रवाहापासून अतिरेकी डावा नक्षलवाद दूर ठेवला गेला त्यात विजयन यांचे नाव खूप वरच्या क्रमावर घ्यावे लागते. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी कन्नूर जिल्ह्यातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कन्नूर जिल्ह्याच्या समितीच्या सदस्यपदावर त्यांची निवड झाली. याच काळात त्यांना दीडएक वर्षे तुरुंगवासही घडला. तुरुंगात त्यांचा शारीरिक छळदेखील झाला. त्यानंतर केरळ राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड झाली. त्याच काळात सीपीएमच्या राज्य सचीवपदावर त्यांची निवड झाली. राजकारणातल्या त्यांच्या वाटचालीत विधीमंडळाचा टप्पा येणे अपरिहार्यच होते.
१९७० मध्ये वयाच्या अवघ्या पंचविशीत असतांनाच कुठूपाराम्बा ह्या मतदारसंघातून ते केरळच्या विधानसभेत निवडून गेले. त्यानंतरची जवळपास पंचेचाळीसपेक्षा जास्त वर्षे ते केरळच्या राजकारणात अग्रस्थानी राहिलेले आहेत. केरळ विधानसभेवर पाच वेळा निवडून आलेले ते एक जेष्ठ विधिमंडळ सदस्य आहेत. यातली महत्वाची गोष्ट म्हणजे १९७० पासून २०१६ पर्यंतच्या ज्या निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत त्यांच्यात त्यांचे मताधिक्य सतत वाढते राहिलेले आहे.
१९९६ मध्ये इ.के.नयनार मंत्रीमंडळात उर्जा आणि सहकार खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात राज्याच्या विजेच्या उत्पादनात आणि वितरणाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली होती . सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांना त्यांच्या सहकारी चळवळीतल्या अनुभवाचा खूपच उपयोग झाला . ते एक प्रभावी आणि कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जात असत पण आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचा खूप मोठा काळ त्यांनी संघटनात्मक कामात ते राहिलेले आहेत. त्यामुळेच सीपीएमच्या केरळमधल्या संघटनात्मक जडणघडणीत त्यांचे योगदान विशेष महत्वाचे राहिलेले आहे. त्यामुळेच बहुधा केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे केरळमधले सर्वाय दीर्घ काळ सेक्रेटरी राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
१९९८ ते २०१५ अशी तब्बल सतरा वर्षे विजयन त्या पदावर राहिले होते. पक्षाच्या केंद्रीय पॉलिट ब्युरोचे देखील ते गेली चौदापंधरा वर्षे सदस्य राहिलेले आहेत. पक्षाशी असणाऱ्या त्यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला २००७ साली अच्युतानंदन मुख्यमंत्री असतांना. त्यावेळी दोघांनी एकमेकांच्या विरोधात जाहीरपणाने टीका करणारी वक्तव्ये करायला सुरुवात केली होती. त्यांच्या ह्या ‘ बेशिस्त’ वर्तनाची पक्षाच्या पॉलिट ब्युरोने गंभीर दखल घेत दोघांचीही पॉलिट ब्युरोतून हकालपट्टी केलेली होती. यातला ग्म्तोचा भाग असा की अशी हकालपट्टी झालेली असतांनाच्या काळात अच्युतानंद केरळच्या मुख्यमंत्रीपदावर कायम होते आणि विजयन पक्षाच्या राज्य शाखेच्या सचीवपदावर राहिले होते. दोघेही पक्षाचे जेष्ठ नेते असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करतांना पक्षाची जी पंचाईत झालेली होती तीच ह्या अर्धवट कारवाईमधून व्यक्त होत होती. एकुणात केरळच्या सीपीएम पक्षाचे विजयन हे एक आधारस्तंभ आहेत हे नक्की.
आपल्या जवळपास पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत विजयन काहीवेळा अडचणीतही आले आहेत. राज्याचे उर्जांमंत्री असतांना त्यांनी लवलीन ह्या कॅनडियन फर्मशी जनरेटर्सच्या दुरुस्तीबद्दलचा करार केला होता. त्या करारावर नंतर बरीच टीका झालेली होती. त्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी देखील झाली. ह्या प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रात विजयन हे आरोपी होते. पुढे न्यायालयाने सर्वांना निर्दोष ठरवून मुक्त केले.
चेन्नई विमानतळावर विजयन ह्यांच्या सामानात पाच जिवंत काडतुसे सापडली होती. ह्याच काळात केरळच्या कॅथॉलिक बिशप्सच्या बरोबर शिक्षण संस्थांच्या संचालनाच्या विषयावरून जाहीर वाददेखील झाला होता. आत्ता देखील बहुचर्चित सुवर्ण आयात घोटाळ्याचे धागेदोरे विजयन आणि मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्याची चौकशी सुरू आहेतच. त्या आरोपांकडे लोकांनी फारसे लक्ष्य दिलेले दिसत नाही. कोरोनाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामगिरीचा त्यांच्या निवडणुकीमधल्या यशामध्ये महत्वाचा वाट आहे हे सारेजण मान्य करतात.
आजवर केरळमध्ये आलटून पालटून युडीएफ आणि एलडीएफच्या हाती सत्तेच्या चाव्या राहिलेल्या आहेत. यावेळीही युडीएफला नाकारून लोकांनी एलडीएफकडे सत्ता सोपवलेली आहे. राज्यात भाजप सतत धडका मारतो आहे. अशा स्थितीत राज्याची धुरा सलग दुसऱ्यांदा विजयन यांना सांभाळायची आहे. बंगालमध्ये डावे जवळपास पूर्णतः संपलेले आहेत. केरळच काय तो त्यांच्या हाती आहे. केंद्रात विरोधी भाजपचे सरकार आहे . त्यापेक्षाही कोरोनाचे संकट गडद होते आहेत. अशा स्थितीत राज्यकारभाराचा शकट चालवायचे आव्हान विजयन ह्यांच्यासमोर आहे. ते हे आव्हान कसे पेलतात यावरच एलडीएफचे भवितव्य ठरणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!