ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे तसे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसारखेच. पण, सध्या ते चर्चेत का आले आहेत, त्यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी आहे, कोरोनाची स्थिती असो की नैसर्गिक आपत्ती या साऱ्याच प्रसंगात अतिशय शांततेने आणि चाणाक्षपणे ते परिस्थिती हाताळत आहेत. त्यांच्या वाटलीचा हा आढावा…
औद्योगिकदृष्ट्या मागास समजल्या गेलेल्या ओडिशामधल्या औद्योगिक संस्थांकडून आपले पुढारपण मिरवणाऱ्या महाराष्ट्राला ऑक्सीजन पुरवायला सुरुवात झाली आणि सगळ्यांचे लक्ष ओडिशाकडे आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे गेले आहे . काही नेते आपल्याला सतत ऐकू येत असतात, तर काहीजण लोकांसमोर प्रसिद्धीच्या द्वारे सतत दिसत राहतात.. ह्या सगळ्या नेत्यांमध्ये अतिशय शांत राहणारा आणि प्रसिद्धीच्या झोतापासून सतत लांब राहण्यात यशस्वी ठरलेला नेता म्हणून नवीन पटनाईक यांच्याकडे बोट दाखवावे लागेल.
देशातल्या मुख्यमंत्र्यांबद्दलच्या सर्वेक्षणात देशातले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांना पसंती मिळाली आहे . देश कोरोनाच्या संकटात असतांना त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली आहे हे जास्त महत्वाचे आहे. नवीनबाबू हा राजकारणातला एक चमत्कार आहे. वयाच्या पंचाहत्तरीमध्ये असणारे नवीनबाबू आयुष्याची पहिली पन्नासएक वर्षे राजकारणापासून दूर राहिले होते आणि त्यानंतरची सलग एकवीस वर्षे ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून देशातले सर्वात जास्त काळ सलग सत्तेवर असणारे मुख्यमंत्री आहेत.
नवीनबाबू यांचे वडील बिजू पटनाईक हे ओडिशामध्ये एक दंतकथा बनलेले आहेत. नवीन यांचे लहानपण मुख्यतः दिल्लीमध्ये गेले. देहरादूनच्या डूनस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. नंतर दिल्लीमधल्या किरोडीमल कॉलेजमधून त्यांनी कलाशाखेतली पदवी घेतली . दिल्लीमधल्या अनेक महत्वाच्या सोशल ग्रुप्समध्ये त्यांचा वावर होत असे.
राजकारणातल्या प्रवेशाच्या अगोदरच्या काळात तीन गाजलेली पुस्तके देखील त्यांनी लिहिलेली आहेत. आयव्हरी-मर्चंट यांच्या डिसीव्हर ह्या इंग्रजी चित्रपटात एक लहानशी भूमिकादेखील केली होती. १९९७मध्ये बिजुबाबू यांच्या निधनानंतर नवीनबाबू राजकारणात आले . सुरुवातीला भाजपाच्या बरोबर युतीमध्ये त्यांनी निवडणुका लढवल्या.
वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीपदावर देखील राहिलेले आहेत. बिजू जनता दलाचे सरकार ओडिशामध्ये तब्बल पाच निवडणुकांमध्ये आणण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत. सुरुवातीला जरी ते भाजपाबरोबर होते तरी नंतरच्या काळात त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग स्वीकारला आणि समोर भाजपा सारखा तगडा प्रतिस्पर्धी असूनही ते यशस्वी होत राहिले.
कोरोनाच्या संकटात असतांना आलेल्या अम्फान चक्रीवादळालासुद्धा त्यांनी यशस्वीपणे तोंड दिले आहे. अल्पावधीत लाखो लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करणे, लोकांना सहाय्य मिळेल अशी व्यवस्था करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे अशा जबाबदाऱ्या सहजतेने उचलण्यासाठी सक्षम प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यात ते यशस्वी झाले म्हणूनच हे साधले गेले यात शंकाच नाही.
राज्याच्या नोकरशाहीशी समन्वय राखून काम करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे हे अनेकदा सिध्द झालेले आहे. एका अविकसित राज्याची धुरा वाहत असतांना राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यात त्यांना स्पृहणीय यश मिळाले आहे हे नक्की. करोनाशी लढ्याच्या सध्याच्या काळात ओडिशा सरकारची कार्यपद्धती आदर्शवत ठरतेय. ओडिशात करोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यात त्यांना यश आले आहे. आणि हे साधण्यासाठी अनेक महत्वाचे उपाय त्यांनी योजले आहेत आणि देशात इतरत्र काही होण्याअगोदर नवीनबाबू यांनी हे केले हे महत्वाचे आहे.
आपल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन स्थापन करण्यात ओडिशा सरकार पहिले होते. या हेल्पलाईनद्वारे सरकारी यंत्रणांनी नागरिकांना करोनापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याचं मार्गदर्शन केलं. याचसोबत या हेल्पलाईमुळे सरकारला संशयित रुग्णांबद्दलही माहिती मिळत होती . मागच्या वर्षी देशभरात लॉकडाऊनची घोषणा होण्याआधीच पटनाईक सरकारने महत्वाच्या शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित केले होते. केंद्राच्याही अगोदर ओडिशा सरकारने करोनासंदर्भात रुग्णांची सर्व माहिती मिळावी यासाठी एक खास वेबसाईट तयार केली होती.
राज्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संकेतस्थळावर आपलं नाव नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं. राज्यात वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढच्या चार महिन्यांचा पगार आगाऊ स्वरुपात देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती . लोकांच्या वैद्यकीय सेवेचा सर्व खर्च सरकार उचलेल असा निर्णय घेतला गेला . करोनाची लागण व्हायच्या आधी ओडिशा सरकारने गावागावांमध्ये जात लोकांना घरातच राहण्याची विनंती करण्यास सुरुवात केली गेली. याच काळात आलेल्या चक्रीवादळाचा आपत्तीने त्यांच्यासमोर दुसरे संकट उभे राहिले होते पण त्यातून ते यशस्वीपणे बाहेर आले.
इतर पुढारलेल्या प्रांतांमधून ओडिशात प्रत येणाऱ्या श्रमजीवींचा प्रश्न देखील मोठा गंभीर होता. नवीनबाबूंनी तो देखील यशस्वीपणाने हाताळला. आणि हे सगळ करीत असतांना केंद्रासह कुणावरही त्यांनी कधी काही आरोप किंवा टीका केलेली ऐकायला आली नाही. पंतप्रधानांना शांतपणे आपले म्हणणे पटवून देण्यात ते नेहमीच यशस्वी ठरलेले आहेत. म्हणूनच राजकीय मतभेद असूनही केंद्रातले नेते त्यांच्या मताचा नेहमीच आदर करीत आलेले आहेत.
हे सगळे साधत असतांना सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना ओडिया भाषा बोलता येत नाही..नव्हे त्यांना आणि लोकांना त्याची गरजही वाटलेली नाही. भाषा हा अस्मितेचा मुद्दा बनवला जात असतांना ही गोष्ट म्हणजे एक आश्चर्य म्हणावे लागेल. आणि त्यांच्या बाबतीतली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते अतिशय शांतपणाने कोणाशीही – विशेषतः केंद्राशी– मोदी-शहा यांच्याशी कोणताही वादविवाद निर्माण होऊ न देता त्यांनी ही किमया साधलेली आहे. म्हणूनच ते लोकप्रियतेच्या बाबतीत आज सर्वोच्च स्थानावर आहेत . इतर अनेक नेत्यांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे हे नक्की.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!