नव्या भूमिकेच्या शोधात एम के स्टॅलिन
तामिळनाडूत सत्तांतर घडविल्यानंतर स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप…

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – [email protected]
अपेक्षेप्रमाणे तमिळनाडूत सत्तांतर झाले. जयललिता यांच्या पश्चात निवडणुकीला सामोरे जात असलेल्या अण्णा द्रमुकला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. तिथे द्रविड मुन्नेत्र कळघमच्या स्टॅलीन यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अडूसष्ट वर्षांचे मुथुवेल करुणानिधि स्टालिन हे तमिळनाडचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे पुत्र. द्रविड मुन्नेत्र कझगमची सर्व सूत्रे करुणानिधी यांच्याच कुटुंबाच्या हातात आहेत. त्यांच्या तिस-या पत्नीची मुलगी कणीमोझी राज्यसभेत खासदार आहे. दुसरी पत्नी दयालुअम्मा ह्यांचा मोठा मुलगा अलगिरी केंद्रात मनमोहनसिंग मंत्रीमंडळात होता.
स्टॅलीन हा करुणानिधी आणि दयालुअम्मा यांचा दुसरा मुलगा. तिसरा राजकारणात नाही. थामीजरासु हे एक चित्रपट निर्माते आहेत. करुणानिधी यांचे भाचे मुरसोळी मारन हे वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांचा मुलगा दयनिधी मारन मनमोहनसिंह मंत्रिमंडळात मंत्री होता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. एखाद्या वृध्द माणसाचे होते त्याप्रमाणे करुणानिधी परिवारातही वारसदारासाठी जोरदार संघर्ष झाला आणि स्वतः करुणानिधींनी आपला उत्तराधिकारी म्हणून स्टॅलीनच्या नावाची घोषणा केली.
करुणानिधींनी आपल्या ह्या मुलाचे नाव रशियाच्या जोसेफ स्टॅलीनच्या नावावरून ठेवले होते. तो स्टॅलीन क्रूरकर्मा हुकुमशहा म्हणून लोकांना परिचित आहे. पण रशियाला दुसरे महायुद्ध जिंकून देणारा एक पोलादी ताकदीचा नेता म्हणूनदेखील त्याचे नाव लोकांना माहिती आहे. ह्या स्टॅलीनचा जन्म झाला त्या आठवड्यातच त्या स्टॅलीनचे निधन झाले होते आणि त्या हिटमध्ये करुणानिधींनी आपल्या मुलाला स्टॅलीनचे नाव दिले.
चेन्नईचे न्यू कॉलेज आणि मद्रास विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतलेल्या स्टॅलीन यांचा राजकारणात प्रवेश होणार हे जवळपास नक्की होते. स्टॅलीन यांचा राजकारणातला प्रवास ब-याच लहानपणापासूनच सुरु झाला. १९६७ च्या निवडणुकांमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या पक्षाच्या प्रचाराची घुर सांभाळली होती. तेंव्हापासूनच राजकारण हे त्यांचे क्षेत्र राहणार हे जवळपास नक्की झालेले होते. त्याप्रमाणे झालेदेखील. पुढे आणीबाणीच्या काळात मिसाखाली त्यांना तुरुंगात रहावे लागले आणि त्यानंतर त्यांच्या पूर्णवेळ राजकीय कारकिर्दीची सुरुवातच झाली होती.
१९८९ च्या निवडणुकांमध्ये ते तमिळनाडू विधानसभेवर निवडून आले. आणि त्यानंतर सलग चार वेळा त्यांची विधानसभेवर निवड झाली. १९९६ साली चेन्नईच्या महापौर पदासाठी थेट सर्वसाधारण मतदारांमधून झालेल्या थेट निवडणुकीत ते पहिले थेट निवडून आलेले महापौर झाले. २००१च्या निवडणुकांमध्ये ते चेन्नईच्या महापौरपदावर पुन्हा निवडून आले. त्याचवेळी ते विधानसभेचे सदस्यही होतेच. तमिळनाडूचे राजकारण म्हणजे करुणानिधी आणि जयललिता यांच्यातली राजकीय रस्सीखेचच. त्यात कधी करुणानिधी वरचढ ठरायचे तर कधी जयललितांचे पारडे जड व्हायचे.









